महसूल विभागातील नायब तहसीलदार ते अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या संघटनेचे अद्ययावत संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून सामान्यांना याचा चांगला उपयोग होणार आहे. उपजिल्हाधिकारी डॉ. विकास नाईक यांनी गेल्या सहा महिन्यांपासून नोकरीच्या कालावधीशिवाय दररोज सुमारे आठ तास मेहनत घेऊन हे संकेतस्थळ विकसित केले. देशभरातील अद्ययावत संकेतस्थळ म्हणून याचे कौतुक होत आहे.
मुंबई येथे या संकेतस्थळाचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री प्रकाश साळुंके व महसूल विभागाचे प्रधान सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांच्या उपस्थितीत पार पडले. राज्यातील सुमारे अडीच हजार महसूल अधिकाऱ्यांची अद्ययावत माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेल्या ११२ वर्षांंपासूनचे सुमारे साडेअकरा हजार शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असून विभागाच्या दैनंदिन गरजेप्रमाणे त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. महसूल विभागातील २३ शाखांत याचे वर्गीकरण करून सर्व माहिती उपलब्ध केली आहे.
भविष्यकाळात ‘जे येथे नाही ते कुठेही नाही’ इतक्या आत्मविश्वासाने संकेतस्थळावर अद्ययावत माहिती देण्यात आली. देशभरातील सुमारे ५०० पेक्षा जास्त संकेतस्थळांचा अभ्यास करून हे संकेतस्थळ विकसित केले आहे. महसूल व्यासपीठ हे संकेतस्थळावरील चर्चापीठ असून त्यावर विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. महसूलविषयक कायदे, नियमातील सुधारणा यावरील चर्चा अपेक्षित आहे. जनतेच्या महसूलविषयक प्रश्नांची उत्तरे या संकेतस्थळावर दिली जाणार आहेत. राज्याच्या सर्व जिल्हय़ांतील पर्यटनविषयक माहिती, नकाशे व तहसीलदारांचे दूरध्वनी क्रमांक यावर उपलब्ध केले आहेत. ज्यामुळे कोणालाही त्याचा लाभ घेता येणार आहे. महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. हे संकेतस्थळ सर्वाचे, सर्वासाठी अशा स्वरूपाचे असल्यामुळे यात महसूल विभागातील लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
महसूलविषयक देशभरात प्रथमच इतके अभ्यासपूर्ण संकेतस्थळ विकसित केले गेल्यामुळे त्याचा अधिकाधिक लोकांना लाभ होणार आहे. उपजिल्हाधिकारी डॉ. विकास नाईक यांनी घेतलेल्या परिश्रमाचे महसूलमंत्र्यांसह सर्वानीच तोंडभरून कौतुक केले. महसूल विभाग म्हणजे किचकट असा लोकांचा समज आहे, तो दूर होण्यास या संकेतस्थळाचा चांगला उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.