16 December 2017

News Flash

लग्नसराईचा धडाकेबाज मुहूर्त!

वरसंशोधनासाठी झिजविलेल्या चपला, वधुवर सूचक मंडळाच्या कार्यालयांतील खेटे, ‘दाखविण्या’च्या किंवा ‘बघण्या’च्या निमित्ताने स्वयंपाकघरात शिजलेले

विशेष प्रतिनिधी | Updated: November 30, 2012 10:52 AM

वरसंशोधनासाठी झिजविलेल्या चपला, वधुवर सूचक मंडळाच्या कार्यालयांतील खेटे, ‘दाखविण्या’च्या किंवा ‘बघण्या’च्या निमित्ताने स्वयंपाकघरात शिजलेले कांदेपोहे, इंटरनेटच्या महाजालातून केलेली साथीदाराची शोधमोहीम आणि सोशल साइट्सवरील गप्पांची देवाणघेवाण अशा असंख्य मार्गानी जुळलेली मने आता परस्परांच्या साथीने जीवनाची वाटचाल करणाऱ्या पहिल्या ‘सप्तपदी’साठी सज्ज झाली आहेत. मुंबईचा परिसर सनई-चौघडे आणि बँड-बाजांच्या सुरांनी दुमदुमून गेला आहे.. वराती आणि आतषबाजीने रस्ते फुलून गेले आहेत.. लग्नाचे मुहूर्त सुरू झाले आहेत! शुक्रवारी एकाच दिवशी मुंबई ठाण्यात जवळपास ३० हजार जोडप्यांनी लग्नाच्या गाठी बांधल्या आहेत.
गेल्या आठवडय़ात मुंबईने लग्नाचा एक महासोहळा अनुभवला. तब्बल चार दिवस चाललेल्या या सोहळ्यात, कोटय़वधी रुपयांची आतषबाजी झाली. महागडय़ा मोटारींच्या भेटीतून मानपानाचा सोहळा पार पडला. उद्योग, कला, क्रीडा, चित्रपट आणि राजकारणातील अनेक सेलिब्रिटींच्या साक्षीने पार पडलेल्या यंदाच्या लग्नाच्या सीझनमधील हा पहिला सोहळा मुंबईकरांच्या चर्चेचा विषय ठरला, आणि यापुढचे सगळे मुहूर्तदेखील अशाच धूमधडाक्यात साजरे होणार याची पक्की खूणगाठही मुंबईकरांनी मनाशी बांधली. जवळपास आठवडाभर चाललेल्या या विवाह महोत्सवानंतर लगेचच, मुंबईचे डोळे येत्या १४ डिसेंबरला होणाऱ्या एका सेलिब्रिटी सोहळ्याकडे लागले आहेत. अभिनेत्री विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या विवाहाच्या बातम्या अनेक दिवस येत होत्या. आता १४ डिसेंबरला विद्या विवाहाच्या वेदीवर पाऊल टाकणार, अशी चर्चा आहे. गंमत म्हणजे, याच तारखेला विद्या बालनची बहीण रूपा हिचाही विवाह झाल्याने, दोघी बहिणी पुढच्या वर्षांपासून एकाच दिवशी लग्नाचे वाढदिवस साजरे करणार आहेत..
गेल्या वर्षी, २०११ मध्ये ११ नोव्हेंबरच्या एकाच दिवशी हा ११-११-११ चा अनोखा मुहूर्त साधून मुंबईत जवळपास ४० हजार विवाह पार पडले होते. यंदा १२-१२-१२ चा दिवस विवाह मुहूर्त म्हणून योग्य नसल्याने हा योग साधण्याची इच्छा असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. मुळात फेब्रुवारीतही मुहूर्त कमीच असल्याने, आजपासून सुरू झालेला ‘वेडिंग सीझन’ आता मुंबईत ‘फुल्ल फॉर्मात’ असणार, याचे संकेत आजच मिळाले आहेत. शहर आणि उपनगरांतील सर्व कार्यालये केव्हाच बुक झाल्याने, आताआता ज्यांचे विवाह जुळले, त्यांना नाईलाजाने मुंबईबाहेरची कार्यालये गाठावी लागतील, असे दिसू लागले आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडीने चर्चगेटकडे जाताना मरिन ड्राईव्हवरील जिमखान्याची मैदाने सजू लागली, की मुंबईच्या विवाहसोहळ्यांच्या उत्साहाचा झगमगाट जाणवू लागतो. उपनगरातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये आज लग्नाची धामधूम स्पष्ट दिसत होती. काही ठिकाणी तर, विवाह सोहळ्यांसाठी आलेल्या पाहुण्यांच्या वाहनांची गर्दी झाल्याने रस्ते अरुंद झाले, आणि वाहतुकीची कोंडी झाली. मुंबईच्या रेल्वेगाडय़ांची गर्दी संध्याकाळी खरे तर शहराकडून उपनगरांकडे वाहात असते. पण आज संध्याकाळीही उपनगरांकडून शहराकडेदेखील गर्दीचा ओघ दिसत होता. यातील बरेचसे प्रवासी लग्नसोहळ्याचे निमंत्रित होते, हे स्पष्ट होण्यासाठी त्यांना मुद्दाम विचारण्याची गरज नव्हती.
लग्नाच्या सीझनमुळे मुंबईच्या बाजारपेठांमध्येही उत्साहाचे वारे वाहात आहेत. दोनपाच हजारांपासून लाखो रुपये किंमतीच्या झगमगत्या साडय़ांनी सजलेला कापड दुकानांच्या शो-रूमचा दर्शनी भाग महिलांना भुरळ घालू लागला आहे, तर सोन्याच्या पेढय़ांमधील गर्दीही वाढतच आहे. दागिने घडविणाऱ्या कारागीरांना उसंत नाही, तर कपडे शिवणाऱ्या लहानमोठय़ा कारागीरांना तारखा सांभाळताना कसरत करावी लागत आहे. विवाह सोहळ्याच्या मेंदी समारंभापासून हनीमूनसाठी प्रवास, हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व कामांचे आयोजन करणाऱ्या मॅरेज ऑर्गनायझर्सचा धंदाही यंदा तेजीत आहे. सोहळ्यातील भोजनाचा मेन्यू, विवाहस्थळाची सजावट, पाहुण्यांची सरबराई इथपासून अगदी वरातीच्या आयोजनापर्यंत सर्व गोष्टींची कंत्राटे देऊन निर्धास्त राहणाऱ्या वधु-वरपित्यांची संख्याही आजकाल वाढली आहे. त्यामुळे, विवाहस्थळाची सजावट पारंपरिक, आधुनिक, पाश्चिमात्य, राजस्थानी, पंजाबी धाटणीची किंवा अगदी ग्रामीण ढंगाची.. जशी हवी तशी बनवून देणारे कारागीरही आजकाल उपलब्ध आहेत. त्यामुळे, विवाह सोहळे अविस्मरणीय ठरविण्याची छुपी स्पर्धाच शहरात सुरू झाली आहे. त्यामुळे, यंदाच्या लग्नसराईमध्ये साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक लग्नामागे  एकएक सुरस अशी गोष्ट असेल, असे दिसत आहे..   

First Published on November 30, 2012 10:52 am

Web Title: wedding season started