कॉर्पोरेटमध्ये बारा- चौदा तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक सेवा सुविधांमध्ये बदल होत आहेत. रुग्णालय सेवा ही त्यापैकीच एक. कॉर्पोरट कर्मचाऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी ओपीडीच्या वेळा बदलण्यापासून सुरुवात केलेल्या शहरातील वैद्यकीय क्षेत्राने आता रुग्णांच्या सोयीनुसार लहान शस्त्रक्रिया शनिवार-रविवारी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
मुंबईत खरे तर २४ तास सुरू राहणारे शहर. त्यातच सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कार्यालयीन वेळेत गेल्या दशकभरात झालेल्या टोकाच्या बदलांचा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत गर्दी असलेल्या लोकल ट्रेन हे त्याचे प्रातिनिधीक रूप. ग्राहकांसाठी दुकान, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी यांनीही सेवांच्या वेळा लांबवल्या आहेत. दवाखाने, स्पेशल क्लिनिक आणि रुग्णालयातील ओपीडीच्या वेळेतही बदल झाले. सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत डॉक्टर रुग्णांसाठी उपलब्ध होऊ लागले. आता शस्त्रक्रियांच्या वेळाही ग्राहकांच्या सोयीने ठरवण्यात येऊ लागल्या आहेत.
महानगरांमध्ये एकत्र कुटुंब नसतात. कामाच्या दिवसांमध्ये शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला वेळ काढता आला तरी त्याच्यासोबत राहण्यासाठी पती / पत्नीला रजा काढणे कठीण जाते. लहान मुलांची काळजी घेतानाही तारांबळ उडते. याचा विचार करून वीकेण्डला अतिरिक्त शुल्क न घेता शस्त्रक्रिया करण्याचा विचार अंमलात आणला गेला, असे कोहीनूर रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव बोधनकर यांनी सांगितले. पित्ताशयातील खडे, ओपन हर्निया, थायरॉइड, एण्डोस्कोपी, गर्भाशयमुखाची बायोप्सी, कानाच्या शस्त्रक्रिया अशा पन्नास प्रकारच्या लघु शस्त्रक्रिया शुक्रवार ते रविवार दरम्यान केल्या जाऊ शकतात.