रामनवमीनिमित्त भजनांची डबलबारी
डोंबिवली येथील श्रीराम मित्र मंडळ आणि श्रीराम समर्थ शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १९ एप्रिल रोजी रघुवीरनगर डोंबिवली (प.) येथील श्रीराम मंदिरात उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम, संध्याकाळी सहा वाजता गीतरामायण तसेच रात्री ९ वाजता भगवान लोकरे विरुद्ध नारायण मेहेतर यांची संगीत भजनांची डबलबारी होईल.
मृणाल ठाकूरदेसाई यांचे गायन
अंबरनाथ येथील कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाच्या येथील शाखेच्या वतीने रविवार २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता ब्राह्मण सभा सभागृह, वडवली, अंबरनाथ (पूर्व) येथे वासंतिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात मृणाल सचिन ठाकूरदेसाई सुगम संगीत गायनाची मैफल सादर करणार आहेत. संपर्क- प्रमोद अमृते- ०२५१/२६०३७९६.
वासंतिक साहित्य मेळावा
कल्याण येथील सार्वजनिक वाचनालय आणि चैत्रेय वासंतिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण (प.) येथे आयोजित साहित्य मेळाव्यात चैत्रेय वासंतिक विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. डॉ. महेश केळुस्कर, प्रा. अशोक बागवे, अरुण म्हात्रे, वा.न. सरदेसाई, मनोहर रणपीसे, ए. के. शेख, सतीश सोळांकुरकर, माधव डोळे, किरण येले, दिवाकर गंधे, दुर्गेश सोनार, भरत दौडकर, कमलाकर मेंडकी, निकिता भागवत आणि राजीव जोशी आदी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे स्मिता भालेराव, सुचेता नलावडे, शेखर जोशी, संध्या परांजपे, जुईली पाठक हे वाचक प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
वसंतोत्सव
ठाण्यातील सखी शेजारणी महिला मंडळाच्या वतीने शनिवार २० एप्रिल रोजी दुपारी ४. ३० वाजता राममारुती रोडवरील हळदणकर सभागृहात वसंतोत्सवानिमित्त स्वरवंदना हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
‘शुक्रतारा’चा सुवर्ण महोत्सव
ठाण्यातील ऋतुरंग या संस्थेच्या वतीने शनिवार २० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता गडकरी रंगायतन येथे ‘शुक्रतारा’ या गीतास ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक विशेष मैफल आयोजित करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायक अरुण दाते, अनुराधा पौडवाल, अनुराधा मराठे आणि धनंजय म्हसकर या मैफलीत सहभागी होणार असून मंगला खाडिलकर सूत्रसंचालन करणार आहेत. पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सचे दाजीकाका गाडगीळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.  
पं. शिवानंद पाटील स्मृती मैफल
शास्त्रीय संगीतातील गुणी गायक पं. शिवानंद पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त योजना प्रतिष्ठानतर्फे संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पं. शिवानंद पाटील यांच्या पत्नी व शिष्या योजना शिवानंद यांचे गायन ऐकायला मिळणार असून त्यांना प्रकाश वगळ, गुरूनाथ घरत, उमेश मळिक हे कलावंत साथसंगत करतील. या मैफलीचे निवेदन किशोर सोमण करणार आहेत. मंगळवार, २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता साठय़े महाविद्यालय सभागृह, दीक्षित मार्ग, विलेपार्ले पूर्व येथे ही संगीत मैफल होणार असून तत्पूर्वी शिवानंद पाटील यांनी गायलेल्या शास्त्रीय गायनाची ‘शिवस्वर’ ही सीडी सारेगामा या म्युझिक कंपनीतर्फे प्रकाशन करण्यात येणार आहे. शास्त्रीय गायनाबरोबरच भक्तीसंगीत, नाटय़संगीत, संगीत दिग्दर्शन अशा संगीताशी संबंधित विविध प्रकार सादर करणारे पं. शिवानंद पाटील यांच्या गाण्यांची ही सीडी आहे. गीता नायक, श्रीराम बापये, रामदास भटकळ, डॉ. विशेष नायक, पं. दुर्गा प्रसाद मझुमदार, पं. मधुकर जोशी असे विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
‘हेवनली व्हिजन’
घनश्याम गुप्ता यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘हेवनली व्हिजन’ २४ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाच्या कला दालनात भरविण्यात येणार आहे. कृष्णाचे अमूर्त शैलीतील चित्र, त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचे, लक्ष्मीचे, महावीरांचे चित्र अशी देवदेवतांची चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. ध्यानधारणा या विषयावर आधारित चित्रेही यात असून या प्रदर्शनाचे उद्घाटन २४ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता राजीव कसट, विकाश मित्तेरसैन, देवांग देसाई, चंदन तहिलानी, शशी जालन, आयन मॅक्डोनाल्ड, शेखर गायकवाड, विनोद मलकानी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. २४ आणि २५ असे दोनच दिवस हे प्रदर्शन सकाळी १० ते सांयकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
वसंतराव देशपांडे संगीत सभा
वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेतर्फे शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाच्या अनोख्या मैफलींचे आयोजन करण्यात येते. २० व २१ एप्रिल रोजी बारा तास बारा गायक आपली कला सादर करणार असून हा अभिनव कार्यक्रम ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात २० रोजी दुपारी ४.३० ते ११.३० व गडकरी रंगायतन येथे २१ रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत होईल. वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेला १२ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त दोन दिवसांच्या मैफलींचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये भुवनेश कोमकली, चंद्रकांत लिमये, अमरेंद्र धनेश्वर, देवकी पंडित, सुहास व्यास, कौत्सुभ, कृष्णा बोंगाणे, स्वानंद भुसारी, अजय पोहनकर आदी गायक-गायिका सहभागी होणार आहेत.