राज्याची उपराजधानी असलेल्या या शहरात खड्डे नाहीत असा एकही रस्ता नाही. अलीकडच्या काही वर्षांत तर खड्डे असलेले रस्ते हीच या शहराची ओळख झाली आहे. सुशासनाचा दावा करत महापालिकेत विराजमान असलेल्या भाजपच्या राजवटीतले हे चित्र आहे. पायाभूत सुविधांसाठी कमालीचे आग्रही असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी शहरातले खड्डेग्रस्त रस्ते आता सज्ज झाले आहेत.
आधी पाच राज्यांत व आता देशात सत्तेत आलेल्या भाजपचा विकास आणि सुशासन हाच मंत्र राहिला आहे. या पक्षाचे झाडून सारे नेते प्रत्येक भाषणात या मंत्राचा उल्लेख अतिशय अभिमानाने करत असतात. मात्र येथील महापालिकेची सत्ता सांभाळणाऱ्या भाजपच्या नेत्यांना या मंत्राचा चक्क विसर पडला आहे. चंद्रशेखर नावाचे सनदी अधिकारी या शहरात आयुक्त असताना त्यांनी रस्ते विकासावर मोठा भर दिला होता. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गुळगुळीत रस्त्यांची चर्चा नंतर बराच काळ होत राहिली. तेव्हाचे चकचकीत रस्ते आता कुठे गेले असा प्रश्न विचारण्याची वेळ आता नागपूरकरांवर आली आहे. शहराच्या कोणत्याही भागातून फिरले तरी झटके खावेच लागतात, अशी रस्त्यांची सध्याची स्थिती आहे. एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर शहरातल्या रस्त्यावर वाहन चालवायला लावा, असेही लोक आता म्हणू लागले आहेत. मानेच्या व कंबरेच्या आजाराला निमंत्रण देणारे तर कधी थेट मृत्यूशी गाठ घालून देणारे हे रस्ते महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कार्य(?)क्षमतेचा पुरावा आहेत. पालिकेतील सत्तेला चिकटून बसलेले भाजपचे पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी यांना या खड्डय़ांचा त्रास होत नसेल का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र तो थेट विचारण्याचे धाडस कुणी दाखवत नाही. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका दरवर्षी ५० कोटी रुपये खर्च करते. हा पैसा नेमका कुठे जातो, याचा शोध घेण्याची गरज आहे. शहरात सर्वत्र खड्डय़ांचे साम्राज्य असताना पालिकेतील भाजप पदाधिकारी मात्र याला हा जबाबदार, तो जबाबदार असा सापशिडीचा खेळ खेळण्यात रमले आहेत. केवळ वाडा व बंगल्याच्या सभोवतालचे रस्ते चांगले ठेवले म्हणजे झाले अशीच वृत्ती या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येते. बांधकाम मंत्री असताना साऱ्या राज्यभरात रस्त्याचे जाळे विणून नाव कमावणारे नितीन गडकरी या शहराचे खासदार आहेत तर विकासाबाबत आग्रही असलेले देवेंद्र फडणवीस या शहरातील एक आमदार आहेत. या दोन्ही नेत्यांचे समर्थक पालिकेचे सत्ताकारण सांभाळत आहेत. साऱ्या शहरभर खड्डे ठेवून या समर्थकांनी गडकरी व फडणवीसांच्या प्रतिमेलाच बट्टा लावण्याचे काम केले आहे. गडकरी व फडणवीसांच्या नागपुरात खड्डे असलेले रस्ते अशीच प्रतिक्रिया शहरात येणारा प्रत्येकजण नोंदवतो. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांना याच खाचखळग्यातून फिरावे लागते. मात्र हे दोघेही सत्ताकारणात मश्गूल असलेल्या त्यांच्या समर्थकांची खरडपट्टी काढताना कधी दिसत नाहीत. या खड्डय़ांची सवय करून घ्यायची की दुरुस्त होतील याची वाट बघायची याचे उत्तर आता नागपूरकरांना हवे आहे. पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने जाणार ते रस्ते चकाचक करणे हा प्रकार काँग्रेसी परंपरेला शोभणारा आहे. सत्तेत आलेली भाजप सुद्धा त्याच वळणावर जाते, अशी समजूत नागपूरकरांनी करायची का हा खरा प्रश्न आहे. तर अशी ही खड्डेनगरी (संत्रानगरी नाही)आता मोदींचे स्वागत करायला सज्ज झाली आहे.