गणपती बाप्पा मोरया..  मंगलमूर्ती मोरया.. एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. असा जयघोष करीत घरोघरी आणि सार्वजानिक गणेश मंडळात एकदंत, विघ्नहर्ता गणरायाचे आज नागपूरसह विदर्भात विविध ठिकाणी ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत आगमन झाले. घरोघरी आणि सार्वजानिक गणपतीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. लाडक्या गणरायाला घरी नेण्यासाठी सकाळपासूनच गणेशभक्तांनी चितारओळीत एकच गर्दी केली होती.
लाडक्या गणरायाची मूर्ती खरेदी केल्यानंतर ‘मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करीत कोणी कारमध्ये तर कोणी दुचाकी वाहनावर नेत होते. गणपतीच्या मूर्ती सोबत मूषक, जानवे, गोफ, आदी पूजेचे साहित्य खरेदी केले जात होते. यावर्षी चितारओळीत बाहेरगावचे मूर्तीकार मोठय़ा प्रमाणात आल्यामुळे स्थानिक मूर्तीकारांना फारच अडचण झाली. अनेक मूर्तीकारांकडे मुळातच जागा कमी आहे आणि त्यातच बाहेरच्या अनेक मूर्तीकारांनी अतिक्रमण केल्यामुळे अनेक गणेश मंडळांना चितारओळीतून १० ते १२ फूट गणपतीच्या मूर्ती बाहेर काढणे गणेश मंडळाना कठीण गेले. भावसार चौकाकडून चितारओळीकडे येणार मार्ग बंद केल्यामुळे गांधी पुतळा ते अग्रेसन चौक या मार्गावर गणपती नेण्यासाठी आणलेली वाहने ठेवण्यात आली होती. चितार ओळमध्ये गणपतीची मूर्ती नेण्यासाठी लोकांची गर्दी झाल्यामुळे त्या परिसरातील मार्ग सकाळपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. बडकस चौकात अनेक मोठी वाहने उभी केल्यामुळे दुपारी १२ नंतर या भागातील वाहतूक खंोळंबली होती.  
चितारओळ शिवाय शहरात गोकुळपेठ, सक्करदरा, नंदनवन, पारडी, खामला चौक, प्रतापनगर, कमाल चौक पारडी चौक, वाडी, मानकापूर, कोराडी, लक्ष्मीभूवन त्रिमूर्तीनगर, वर्धमाननगर आदी भागात गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गदी केली होती. पारडी परिसरात एच.बी. स्टेटमध्ये विदर्भाचा राजा, रेशिमबागेत नागपूरचा आणि पाताळेश्वर मार्गावर महालचा राजाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीमंत राजे मुधोजी भोसले व गांडल्याच्या गणपतीची मूर्ती वाजत गाजत पालखीत नेण्यात आली. यावेळी मिरवणुकीत वारकरी भजने म्हणत सहभागी झाली होती.
दुपारनंतर सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील एकतर्फी वाहतूक बंद करण्यात आली होती त्यामुळे अनेक मंडळानी रस्त्यावरच वाहने उभी केली होती. अनेक लोक मंगलवेशात गणपतीची मूर्ती नेण्यासाठी आले होते.चारचाकी वाहने सजवून आणली जात होती. ढोल ताशे वाजविणाऱ्या मंडळांना चांगली मागणी होती. चितारओळ पासून ज्या ठिकाणी जायचे आहे ते अंतर पाहून ३ हजार ते ८ हजार रुपयापर्यंत पैसे मंडळांकडून आकारले जात होते. गणरायाच्या स्वागतासाठी शहरातही उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: शहरातील काही भागात सार्वजानिक गणेश मंडळात विविध देखावे साकारले जात आहेत. देखाव्यावर अंतिम हात फिरविण्यासाठी कारागिरांची धावपळ सुरू होती. गणरायाच्या विधिवत प्राणपतिष्ठेसाठी लागणारे सामान, केळीचे खांब, कमळ, केवडा, दुर्वा शमीपत्र, पंचतत्री, पाट वस्त्र खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी होती.
अनेक सरकारी व खाजगी कार्यालयात गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मिष्ठान भंडारमध्ये पेढे, मोदक घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गणेश उत्सवासाठी काही मिष्ठान भंडारने खोव्याचे, पेढय़ाचे, खोबऱ्यांचे मोदक तयार केले होते. या मोदकांना आज चांगली मागणी होती. चितारओळ परिसरात आज गणेशभक्ताची अक्षरश यात्रा भरल्याचे दिसून आले. गणपतीच्या आगमनाला कुठलीही अनुचित घडू नये म्हणून चितारओळशह शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरात भेंडे ले आऊटमध्ये केदारनाथ, दारोडकर चौकातील संती गणेश मंडळात तुळजापूर, दक्षिणामूर्ती चौकात लालबाग मंदिर, महालचा राजामध्ये शिवराज्यभिषेक, गांधीपुतळा चौकात जांबुवंती विवाह, धंतोलीमध्ये ताडोबा जंगल, निकालस मंदिरमध्ये दुर्गासूर वध, इतवारी लोहाओळी भागात तारकासूर वध इत्यादी देखावे तयार करण्यात आले आहे.