ढोलताशांचा दणदणाट, बँजोची तडतड आणि तरुणाईच्या ओसंडून वाहणा-या उत्साहात सोमवारी सांगली, मिरजेत गणरायाचे जल्लोषी स्वागत झाले. गेला एक महिना दडी मारलेल्या वरुणराजानेही गणरायाच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच हजेरी लावली.  ‘श्रीं’च्या स्वागत मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. स्वागत मिरवणुकीमुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले होते.
चैतन्याचा व मांगल्यपूर्ण सण म्हणून ओळखल्या जाणा-या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अवघी तरुणाई आज रस्त्यावर होती. घरगुती गणेशमूर्तीच्या खरेदीसाठी जशी कुटुंबे आली होती, तशीच तरुण मंडळाचे कार्यकर्ते सकाळपासून मंडळाच्या आगमन मिरवणुकीसाठी तयारी करत होते. शहरातील मोठय़ा मंडळांच्या मिरवणुका सवाद्य होत्या. सजवलेल्या ट्रॅक्टरट्रॉलीसह रिक्षांचाही वापर करण्यात आला. झांजपथकांसह बॅन्डपथकांनाही स्वागत मिरवणुकीसाठी मंडळांनी आमंत्रित केले होते.
सांगलीतील मुख्य बाजारपेठेत गणरायाच्या आगमनावेळी वापरण्यात येणाऱ्या सजावटीच्या वस्तूंसोबतच दूर्वा,आघाडा, फळे,उदबत्ती यांच्या विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले होते. कापडपेठ,मारुती रोड, हरभट रोड, गणपतीपेठ, आदी ठिकाणी हे स्टॉल्स लावण्यात आले होते. तर, मिरजेत लक्ष्मी मार्केट परिसरात विक्रेत्यांची गर्दी एकवटली होती. शेतकरी बँक ते सराफ कट्टा या मार्गावर वाहतुकीस पोलिसांनी प्रतिबंध केला होता.
सांगलीचे आराध्य दैवत म्हणून गणेशाला ओळखले जाते. सांगलीतील शाही गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. सांगली संस्थानच्या गणेशाच्या मिरवणुकीचा प्रारंभ गणपती मंदिरापासून झाला. गणपती पेठ, पटेल चौक, राजवाडा चौक या मार्गावर राजवाडय़ातील दरबार हॉलपर्यंत संस्थानच्या श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, सिनेअभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, माजी आ. नितीन शिंदे यांच्यासह नगरसेवक,कार्यकत्रे सहभागी झाले होते.
मिरज संस्थानच्या शाही गणेशोत्सवास यंदापासून प्रारंभ करण्यात आला. किल्ल्यातील माधवजी मंदिरापासून गणेशाच्या स्वागत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. झांजपथक,सनईचौघडा,पालखी, घोडेस्वार, पारंपरिक पोशाखातील भालदार-चोपदार,संस्थानिक गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन,श्रीमती उमाराजे पटवर्धन,गोपाळराजे पटवर्धन,आ. सुरेश खाडे, दर्गा सरपंच अजिज मुतवल्ली, बाळासाहेब मिरजकर आदी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. संस्थानच्या गणपतीची प्रतिष्ठापना गणेश तलावानजीकच्या मंदिरात करण्यात आली.
शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरातील मुख्य रस्त्याचे  सीसीटीव्ही कॅमेराद्वारे निरीक्षण करण्यात येत आहे. राज्य राखीव दलाचे पथक तनात करण्यात आले असून फिरती गस्तीपथकेही शहराच्या विविध भागात रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत. सांगली,मिरजेत ७०० हून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून याबाबतचा निश्चित आकडा उपलब्ध होण्यास अद्याप दोन दिवस लागणार आहेत.
गेल्या महिन्यापासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने आज पहाटेपासून हजेरी लावली. दिवसभर  उसंत घेत पावसाने गणेश भक्तांना दिलासा दिला. मात्र सायंकाळी पुन्हा हजेरी लावली. बाजारात यामुळे विक्रेत्यांबरोबरच गणेशभक्तांची त्रेधा उडाली होती.