सरकारनिर्मित दुष्काळ, अन्न, पाणी, जमीन, घर, शिक्षण, रोजगार, आरोग्य या प्रश्नांवर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने काढलेली संघर्ष संदेश यात्रा बुधवारी परभणीत पोहोचली. या निमित्ताने माकपच्या जिल्हा कमिटीच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढून यात्रेचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय कमिटी सदस्य कुमार शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पाथरी नाका येथे दाखल झाली. येथून माकप जिल्हा कमिटीच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये सभेने रॅलीचा समारोप झाला.
लिंबाजी कचरे यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या सभेत शिराळकर, दत्ता डाके, पी. एस. घाडगे यांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध भाषणे केली. सभेचे प्रास्ताविक विलास बाबर यांनी व सूत्रसंचालन कीर्तिकुमार बुरांडे यांनी केले.