केवळ दुष्काळ पडतो म्हणून नाही तर पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावागावातील विहिरींचा योग्य वापर करायला हवा. पाण्याचा उपलब्ध होणारा मुबलक साठा अडचणींच्या प्रसंगी नागरिकांना मोलाची साथ देऊ शकतो. यासाठी नदीजोड प्रकल्पाप्रमाणे गावागावातील विहिरीजोड प्रकल्प राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासासाठी प्रयत्नशील असलेले डॉ. अविनाश पोळ यांनी नुकतेच येथे केले.
डोंबिवलीतील सर्व रोटरी क्लबतर्फे ‘सेवेतून समाधानाचा मार्ग’ विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आणि व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केला होता. सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमाला कल्याण बॅनर्जी, डॉ.उल्हास कोल्हटकर, डॉ.बाळ इनामदार, अभय कुवळेकर, डॉ. लीना लोकरस, एन.आर.हेगडे उपस्थित होते.
यावेळी गिरीश भारद्वाज, साताऱ्यातील बिबेवाडीचा कायापालट करणारे डॉ.अविनाश पोळ, कचऱ्यापासून इंधन तयार करणारे डॉ. आनंद कर्वे यांचा सन्मान करण्यात आला.
पावसाचे पाणी योग्य रीतीने साठवले तर आपण उर्वरित आठ महिन्यांच्या परिस्थितीवर मात करू शकतो. पावसाचे पाणी वाहून जाते. दुष्काळ पडला की मग उपाययोजनांसाठी धावाधाव सुरू होते. आपण राहत असलेल्या बिबेवाडीमध्ये मुबलक पाणी आहे. हे पाणी विहिरीजोड प्रकल्पाचा अवलंब करून कोरडय़ा विहिरींमध्ये सोडण्यात आले आहे. अशा प्रकल्पांचा शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असे यावेळी पोळ यांनी सांगितले.