एखाद्या वाहिनीवर ‘रिअ‍ॅलिटी शो’ सुरू होणार म्हटल्यावर त्यालाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. याचे अगदी उत्तम उदाहरण म्हणजे ‘कलर्स’वरील ‘बिग बॉस ७’ हा नवा हंगाम. ‘बिग बॉस ७’ येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे दोन मालिका बंद करण्याचा निर्णय याआधीच घेतला असून, प्राइम टाइमला ‘बिग बॉस ७’ची वर्णी लागली आहे. आता मात्र या ‘बिग बॉस’मुळे एक नवाच मुद्दा उपस्थित झालाय, तो म्हणजे मानधनाचा. स्पर्धकांची मानधनाची रक्कम किती आहे यावर चर्वितचर्वण गेल्या वर्षीही सुरू होते. परंतु यंदाही तीच स्थिती आहे. ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक म्हणून नामांकित सेलिब्रिटी हवा असल्यास त्याचे मानधन वाढते. या मानधनात वाहिनीला वाढ करायची नसल्याने ‘बिग बॉस’कडे नामांकित सेलिब्रिटी फिरकत नसल्याची कुजबुज कलाकारांमध्ये होत आहे.
‘बिग बॉस’साठी सलमान खानला दिवसाला मिळणारी रक्कम पाच कोटीच्या घरात आहे. याच्या अगदी उलट स्पर्धकांना देण्यात येणारी रक्कम खूपच कमी आहे. त्यामुळेच यंदा ‘बिग बॉस’मध्ये नामांकित सेलिब्रिटी स्पर्धकांचा तुटवडा आहे. वाहिनीने यापूर्वी अनेक नामांकित सेलिब्रिटींशी संपर्क साधला होता. परंतु मानधन कमी असल्यामुळे पुढे बोलणी होऊ शकली नाहीत. ‘बिग बॉस’च्या घरात जाण्यासाठी व तिथे राहण्यासाठी संबंधित सेलिब्रिटी स्पर्धकांना दिवसाला ठरावीक रक्कम देण्यात येते. ही रक्कम काही लाखांमध्ये असली तरीही फारच कमी असल्याचे बोलले जात आहे.