ऊस दर आंदोलनाचा कोल्हापूर, सांगली व सातारा या उसाच्या पट्टय़ात सोमवारी भडका उडाला. सांगली जिल्ह्य़ातील एक शेतकरी आंदोलक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला.
कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावर जवळपास अर्धा दिवस आंदोलकांकडून वाहनांची जाळपोळ, एसटीची मोडतोड असे हिंसक प्रकार सुरू होते. पोलीस व शेतकऱ्यांत समोरा-समोर दगडफेक झाल्याने अनेक जण जखमी झाले. सातारा जिल्ह्य़ातही आंदोलनाचे लोण वाढत चालले असून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अन्य वाहनांची मोडतोड करण्याचे प्रकार सुरू होते. या आंदोलनामुळे ऐन दिवाळीत शिमगा झाल्याचे चित्र दिसत होते. सामान्य जनता व प्रवाशांची आंदोलनामुळे अक्षरश: फरपट झाली. पत्रकारांनाही वार्ताकन करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
यावर्षीच्या गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल ३ हजार रूपये देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. काल कोल्हापूर येथे सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्य़ांतील साखर कारखानदारांची बैठक होऊन २३०० रूपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच रात्री उशिरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना इंदापूर येथे आंदोलन करीत असतांना अटक झाली. कालच शेट्टी यांनी या निर्णयामुळे शेतकरी जिवाच्या आकांताने रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला होता. त्याचे पडसाद सोमवारी पहायला मिळाले.
कोल्हापूर, सांगली व सातारा या साखरेच्या पट्टय़ात सोमवारी अनेक हिंसक घटनांचा आगडोंब उसळला होता. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हामार्ग इतकेच नव्हे, तर तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवरही सकाळपासूनच शेतकरी रस्त्यांवर उतरला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मानणारा हा शेतकरी वर्ग संतापाने पेटून उठला होता. खासदार शेट्टी यांची सुटका करा व ३ हजार रूपयांची उचल द्या, अशा घोषणा देत व संघटनेचे झेंडे नाचवत शेतकरी रस्तोरस्ती जमले होते. रस्त्यांवर टायर पेटवून देवून त्यांनी वाहतूक अडवून ठेवली होती. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच फटका बसला होता.
सांगली जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये हिंसक आंदोलन होत राहिले. वसगडे येथे आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. येथे वातावरण कांहीसे शांत झाल्यानंतर निम्मे पोलीस बंदोबस्तावर राहिले होते. तर उर्वरित एका खोलीत बसले होते. जमावाने अचानक या खोलीला बाहेरून कुलूप घालण्याचा प्रयत्न केला. जमाव हिंसक होण्याच्या शक्यतेने बाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये चंद्रकांत नलावडे हा शेतकरी जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजल्यावर वसगडेत पुन्हा तणाव निर्माण झाला. जमावाने चार दुचाकी वाहने व एक टँकर पेटवून दिला. जिल्ह्य़ात अन्यत्रही अशा घटना सुरू झाल्याने दुपारनंतर पुन्हा एकदा वाहतूक विस्कळीत झाली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात तर आंदोलन अधिकच जोरकस झाले.प्रत्येक खेडेगावात आंदोलनासाठी शेतकरी रस्त्यांवर गटागटाने उतरले होते. कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली नाका ते तावडे हॉटेल हा सुमारे १ किलोमीटरचा परिसर हिंसक घटनांचे केंद्र बनला होता. या मार्गावरून जाणाऱ्या चार एसटी बसेस आंदोलकांनी पेटवून दिल्या. तसेच पोलिसांची एक व्हॅनही आंदोलकांकडून जाळली गेली. टायर पेटवून देण्याच्या प्रकारांना तर अक्षरश: उत आला होता. सुमारे चार तासांहून अधिक काळ आंदोलक संतापाने बेभान होऊन हिंसक कारवाया करीत होता. शेतात लपून बसलेल्या आंदोलकांकडून गनिमी काव्याने प्रत्युत्तर दिले जात होते. त्यातून पोलीस व शेतकरी यांच्यात समोरा-समोर दगडफेक झाली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक जण जखमी झाले. पोलिसांची कुमक वाढल्यानंतर आंदोलकांनी कांहीशी नरमाईची भूमिका घेतली. सायंकाळी त्यांनी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हजारो शेतकरी जेलभरो आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दोंन्ही बाजूला पाच ते सहा किलोमीटर अंतर वाहने अडकून पडली होती. तर सकाळपासूनच कोल्हापूर शहरासह अनेक भागांतील एसटी वाहतूक बंद झाल्याने ऐन दिवाळीत प्रवाशांची दैना उडाली.