पश्चिम विदर्भात अतिपावसामुळे दूषित पाण्यातून आता जलजन्य आजारांचा फैलाव होण्याची भीती वर्तवली जात असून गेल्याच आठवडय़ात अकोला जिल्ह्य़ात ताप आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील शेंबाळपिंप्रीत अतिसाराची लागण झाल्याने धोक्याची सूचना मिळाली आहे. ग्रामीण भागात जलस्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. रोगांचा मोठा उद्रेक जाणवलेला नसला, तरी अतिसार, टायफाइड, गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
राज्य आरोग्यप्रणाली संसाधन केंद्राच्या (एसएचएसआरसी) च्या ताज्या अहवालानुसार अमरावती विभागात दूषित पाण्याचे प्रमाण यवतमाळ जिल्ह्य़ात सर्वाधिक आहे. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पिण्याच्या पाण्याचे १४ हजार ८४९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा ४ हजार ९८७ म्हणजे ३४ टक्के नमुने दूषित असल्याचे आढळून आले. मिनी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या १३ हजार ९८१ नमुन्यांपैकी ३ हजार ३९६ नमुन्यांमधून (२४ टक्के) पाणी पिण्यायोग्य नसल्याचे उघड झाले. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्य़ांतही दूषित नमुन्यांचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत असल्याचे निदर्शनास आले आहे.
जलजन्य आजारांमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, डायरिया, व्ही. हेपेटायटीस, टायफॉइडसारख्या रोगांचा समावेश आहे. दूषित पाण्यामुळे या आजारांचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर होतो. ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनांमधून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो, असा दावा सातत्याने केला जात असला, तरी अजूनही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणून विहिरींचाच वापर केला जातो. दुर्गम भागात तर हातपंपांशिवाय पर्याय नाही. या पाण्याच्या स्रोतांमध्ये पुराचे पाणी मिसळले आणि क्लोरिनायझेशनशिवाय पाण्याचा वापर झाला, तर जलजन्य आजारांचा धोका असतो. अनेक गावांमध्ये दूषित पाण्यामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या कमी पडू लागली आहे. एकाच गावात आजारांचा फैलाव होण्याची दोन प्रकरणे अमरावती विभागात गेल्या आठवडय़ात समोर आली.
अकोला जिल्ह्य़ातील कटय़ार आणि म्हैसांग प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तापाचे १०३ रुग्ण दाखल झाल्यानंतर एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्पाने (आयडीएसपी) त्याची नोंद घेतली. पिण्याच्या पाण्याच्या तीन नमुन्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा क्लोरिनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.
यवतमाळ जिल्ह्य़ातील इसापूर धरण परिसरातील शेंबाळपिंप्री गावात १३ जणांना अतिसाराची लागण झाली. पुराचे पाणी विहिरीत मिसळल्याने आणि पेयजल म्हणून त्याचा वापर झाल्याने हा आजार फैलावल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. क्लोरिनायझेशनअभावी हा प्रकार घडला. पाण्याचे चार नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाण्याच्या स्रोतांनजीकच्या स्वच्छतेअभावी पाणी दूषित होण्याचे प्रकार निदर्शनास येतात. स्वच्छतेची जबाबदारी ग्रामपंचायतींची आहे. अनेकदा दुर्लक्षामुळे पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली जात नाही. दुसरीकडे, वैयक्तिक वापराच्या विहिरींमध्येही क्लोरिनायझेशनकडे दुर्लक्ष केले जाते. हातपंपांजवळही स्वच्छतेअभावी पाणी दूषित होण्याचा धोका असतो. अमरावती जिल्ह्य़ातील मेळघाटात अनेक गावांमध्ये ही समस्या आढळून आली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये अतिसूक्ष्म जंतूंचे प्रमाण ३५ ते ८५ टक्क्यांपर्यंत असल्याचे तपासण्यांमध्ये उघड झाले आहे.