राजकीय कार्यकर्ते निघाले होते मतदार नोंदणी अभियानासाठी. पण शोध-जागरण यात्रेत त्यांच्या हाती आली सीमेच्या दोन बाजूंना राहणाऱ्या सख्ख्या भावांच्या अतुट प्रेमाची कहाणी. नवी मुंबईतील ऐरोलीच्या सेक्टर १० मधील या कहाणीने आपल्या मनातील प्राथमिक भावना आणि वस्तुस्थिती कळल्यानंतरची उपरती यात किती फरक असू शकतो हेसुद्धा दाखवून दिले.
राज्यात ३० जूनपर्यंत मतदारनोंदणी मोहीम सुरू होती. लोकसभा निवडणुकीत ज्यांची नावे मतदारयादीतून गळाली होती अशांची नावे पुन्हा समाविष्ट व्हावीत या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली होती. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये स्वीकृत नगरसेवक सुरेश भिलारे आपल्या कार्यकर्त्यांसह सेक्टर १० मध्ये या मोहिमेसाठी घरोघर फिरत होते. तेथील ‘मिलेनियम अवनीश’ या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील एका घराचे दार त्यांनी ठोठावले. दार उघडताच आतून एक धिप्पाड, पठाणी तोंडवळ्याचा गृहस्थ सामोरा आला.
‘क्या है?’ त्याने त्रासिक आवाजात सवाल केला.
भिलारे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना मतदार नोंदणी मोहिमची माहिती देऊन त्यांनाही नोंदणी करण्याचे आवाहन केले. त्यावर त्याने ‘हम क्यो निकालेंगे व्होटिंग कार्ड? हम तो पाकिस्तानी है!’ असे उत्तर दिले.
त्याचा पठाणी पेहराव आणि शरीरयष्टी आणि स्वत:च आपण पाकिस्तानी असल्याची कबुली यामुळे कार्यकर्ते चक्रावूनच गेले. ‘पाकिस्तानी’ या एका शब्दाने त्याच्याकडे बघण्याची कार्यकर्त्यांची दृष्टीच बदलली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून भिलारे यांनी स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोरख गोजरे यांना सगळी माहिती दिली. खा. राजन विचारे यांच्या कानावरही सगळा प्रकार घातला. त्यातून पोलीस चौकशीचे चक्रे फिरू लागली.. आणि त्यातूनच मग सगळा उलगडा झाला.
झाले होते असे : उत्तरांचलमध्ये कपडय़ांचा व्यापार करणाऱ्या नानीकराम बत्रा (३५) यांना आपले यकृत (लिव्हर) निकामी झाल्याचे काही महिन्यांपूर्वी समजले. नानीकराम यांचे वडील आणि भाऊ पवन बत्रा पाकिस्तानातील सिंध प्रांतात अटला येथे राहतात. त्या दोघांना नानीकरामच्या आजाराचे कळताच वैद्यकीय व्हिसावर ते दोघे भारतात आले. पवन बत्रा यांनी भावाला यकृतदान करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात होणार आहे. मात्र त्यासाठी अनेक चाचण्या आणि अन्य कामांमुळे त्यांना येथे बराच काळ राहावे लागणार होते. सोयीसाठी बत्रा कुटुंबाने मिलेनियम अवनीशमधील सदनिका ११ महिन्यांसाठी भाडय़ाने घेतली. नेमके त्याच वेळी भिलारे आणि अन्य कार्यकर्ते तेथे पोहोचले आणि त्यांना सामोरे गेले पवन बत्रा.
पोलिसांच्या सखोल चौकशीअंती ही माहिती समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनात राग कुठच्याकुठे पळून गेला. पवन बत्रा ४५ दिवसांच्या व्हिसावर भारतात आले आहेत. तर वडिलांनी आता कायम भारतातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपण ज्यांना पाकिस्तानी नागरिक (म्हणजेच घुसखोर!) समजत होतो ते प्रत्यक्षात भारताशी घट्ट नाते जुळलेले परंतु सीमेच्या दोन बाजूंना राहणारे सख्खे भाऊ असल्याचे कळल्यावर कार्यकर्त्यांच्या मनातील आधीची द्वेषभावना पार पळून गेली