उपनगरी रेल्वे गाडीत घोषणा करण्याची अत्याधुनिक यंत्रणा असूनही आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा वापर न करणारे मध्य रेल्वेचे ‘मुके’ मोटरमन ‘बोलके’ कधी होणार, असा प्रश्न संतप्त प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाल्यास त्याचा फटका मोटरमनला बसण्याची शक्यता आहे. आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या मोटरमनना मध्य रेल्वे प्रशासन किंवा मोटरमन संघटना कधी ‘सरळ’ करणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी रात्री मध्य रेल्वेच्या जलद गाडय़ा चांगल्याच रखडल्या. हवेतील कमालीचा उकाडा, असह्य गर्दी आणि कोणतेही कारण न कळता रखडलेली रेल्वे वाहतूक यामुळे प्रवाशी चांगलेच संतापले होते. प्रत्येक डब्यात रेल्वे प्रशासनाला सामूहिक शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. गाडी वेग कधी घेणार हे समजत नसल्याने हा ‘ताप’ किती काळ चालणार याविषयी सारेच अनभिज्ञ होते. अशा वेळी गाडीतील उद्घोषणा यंत्रणेतून नेमकी माहिती दिली गेली असती तर बहुतांश प्रवासी लगेच ‘थंड’ झाले असते. पण एवढी संवेदनशीलता मध्य रेल्वेचे प्रशासन दाखवेल तर मग आणखी काय हवे?
पश्चिम आणि मध्य रेल्वेवर सध्या ज्या उपनगरी गाडय़ा चालविण्यात येतात त्यामध्ये ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात आली असून मोटरमनच्या केबीनमधून त्यावर पुढील रेल्वेस्थानक कोणते येणार, त्याची ध्वनिमुद्रित उद्घोषणा केली जाते. मोटरमन किंवा गार्ड यांनी माईकवरून जर काही सूचना/उद्घोषणा केली तर ती सुद्धा संपूर्ण गाडीत प्रवाशांना एकाच वेळी ऐकण्याची सोय आहे. पश्चिम रेल्वेचे मोटरमन अशा उद्घोषणा करतात. विरारहून चर्चगेटकडे जाणारी गाडी जर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट रेल्वे स्थानकांवर थांबणार नसेल तर पश्चिम रेल्वेवर उपनगरी गाडय़ांमध्ये मोटरमन ‘ही गाडी मुंबई सेंट्रल ते चर्चगेट या मधील कोणत्याही स्थानकांवर थांबणार नाही’, अशी उद्घोषणा करतात. मग मध्य रेल्वेचे मोटरमन अशा उद्घोषणा का करत नाहीत, असा प्रश्न मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पडला आहे.
अनेकदा उपनगरी गाडी खोळंबून राहते. पुढे सिग्नल नसल्यामुळे, रेल्वेमार्गात गाय, म्हैस आदी प्राणी आल्यामुळे, अपघात झाल्यामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे गाडी रडतखडत सुरू असते तेव्हा प्रवासी अक्षरश: वैतागतात. गाडी इतक्या हळू का चालली आहे, त्याचे कारण प्रवाशांना समजत नाही. असा प्रवास सहनशीलतेचा अंत पाहणारा असतो. अशा वेळी गाडी हळू का चालली आहे, का रखडली आहे आदी माहिती प्रवाशांना दिली गेली तर त्यांची कासाविशी खूप कमी होऊ शकते. असे झाल्यास अज्ञानापोटी होणारी जी चरफड आणि उद्वेग थांबू शकतो. पण मध्य रेल्वे ही बाब ध्यानात कधी घेणार, असा प्रश्न आहे.