इमारतीमधील रहिवासासाठी आवश्यक भोगवटा प्रमाणपत्र रखडल्याने म्हाडाच्या सोडतीत यशस्वी झालेले सुमारे साडेतीन हजार लाभार्थी हैराण झाले आहेत. हक्काच्या घराची प्रतीक्षा आणि त्यावरील कर्जाच्या हप्त्यांचा भरुदड असा दुहेरी मनस्ताप या लाभार्थीना सहन करावा लागत आहे. याबाबत मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी निरंजन सुधांशु यांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, एवढेच सरकारी उत्तर दिले.
‘म्हाडा’ने २०१० मध्ये एकूण ३३८१ घरांसाठी तर २०११ मध्ये ४०३४ घरांसाठी सोडत काढली होती. पैकी २०१० च्या सोडतीमधील ३३८१ घरांपैकी २२७० घरांच्या वितरणाचे काम मार्गी लागले तर उर्वरित १,१११ घरांचा ताबा भोगवटा प्रमाणपत्रांऐवजी रखडला. २०११ च्या सोडतीमधील ४०३४ घरांपैकी ३६४३ घरांच्या इमारतीही भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांचा ताबा रखडला. यामध्ये मालाड- मालवणी येथील अल्प उत्पन्न गटातील २३५० घरे, कांदिवली-शिंपोली येथील अल्प उत्पन्न गटातील ५६४ व उच्च उत्पन्न गटातील १७२, मालाड-गायकवाड नगर येथील अत्यल्प उत्पन्न गटातील २३८ घरे व मध्यम उत्पन्न गटातील ८४ घरे, कुर्ला-विनोबा भावे नगर येथील अल्प उत्पन्न गटातील ३९, शीव-प्रतीक्षा नगर येथील मध्यम उत्पन्न गटातील १९६ घरांचा समावेश आहे. दहिसर, मानखुर्द, पवई, बोरिवली येथील एकूण ३९१ घरांच्या इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले असल्याने त्यांचा ताबा देण्याची प्रक्रिया मार्गी लागली. आता अलीकडे २०१० मधील १,१११ घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू झाली. अद्याप तीन हजार ६४३ घरांचा ताबा ‘ओसी’ नसल्याने रखडला आहे.
या घरांच्या किंमती उत्पन्न गट व घराच्या आकारानुसार पाच लाख ९३ हजारांपासून थेट ५५ लाखांपर्यंत आहेत. बहुतांश यशस्वी अर्जदारांकडून ‘म्हाडा’ने सुमारे ८० टक्क्यांपर्यंतची रक्कम घेतली आहे. त्यामुळे हजारो रुपयांचे कर्जाचे हप्ते सुरू झाले, पण घर ताब्यात कधी मिळणार याची शाश्वती नाही, अशा विचित्र कोंडीत लोक सापडले आहेत. हप्ते फेडण्यासाठी आणि सध्या राहत असलेल्या घराचे भाडे देण्यासाठी प्रचंड मोठा आर्थिक बोजा त्यांच्यावर पडत आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती झाली आहे. ‘म्हाडा’कडे तगादा लावूनही ते थकले.
घर लागल्यानंतर त्याचे पैसे लाभार्थ्यांने मुदतीत भरले नाहीत तर ‘म्हाडा’तर्फे १३ टक्के दंड व्याज आकारले जाते. पण लोकांचे पैसे घेऊनही वेळेत घर देण्याचे ‘म्हाडा’वर कसलेही बंधन नाही. यातून सामान्य माणसांचे प्रचंड हाल होत आहेत. ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली तर भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात येते.

गवईंच्या हवेत बाता!
म्हाडाच्या लाभार्थीना तात्काळ घरांचा ताबा मिळावा, यासाठी आपण स्वत: पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी बैठक घेणार आहोत, असे म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी सतीश गवई यांनी दोन महिन्यांपूर्वी सांगितले होते. मात्र अशी बैठकच झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. म्हाडा पालिकेकडे बोट दाखवत असली तरी म्हाडाकडूनच आवश्यक ती कागदपत्रे सादर केली जात नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र या घोळात म्हाडाचा सामान्य लाभार्थी भरडला जात आहे.