News Flash

तलाश!!!

* लहान मुले, तरुणींना पळविणाऱ्या टोळ्या मुंबईत सक्रिय * बहुतांश लहान मुलांची किडनी विकण्याचा धंदा * टोळ्यांचे धागेदोरे देशभर व आंतरराष्ट्रीय स्तरावरही * उच्च न्यायालयाने फटकारूनही पोलीस उदासीनच! मुंबईतून

| March 14, 2013 02:10 am

* लहान मुले, तरुणींना पळविणाऱ्या टोळ्या मुंबईत सक्रिय
* बहुतांश लहान मुलांची किडनी विकण्याचा धंदा
* टोळ्यांचे धागेदोरे देशभर व आंतरराष्ट्रीय स्तरावरही
* उच्च न्यायालयाने फटकारूनही पोलीस उदासीनच!
मुंबईतून बेपत्ता होणारी लहान मुले आणि महिलांना पळविण्यात गुन्हेगारी टोळ्यांचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. २०११ पासून मुंबईतून ६४५ अल्पवयीन मुले आणि १०५२ महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही. या महिला आणि मुलांना पळवून त्यांना वेश्या व्यवसाय, घरकाम, भीक मागणे, गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची कबुली खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मायानगरी मुंबईतून दररोज अनेक जण बेपत्ता होतात. रस्ता चुकलेले, घरातून रागावून गेलेले, प्रियकरासोबत गेलेल्या, गर्दीत हरवलेले काही दिवसांनी सापडतात. पण अनेकांचा शोध लागतच नाही. अल्पवयीन मुलांना पळवणारी, तरुणींना फूस लावून पळविणारी टोळी मोठय़ा प्रमाणात मुंबईत सक्रिय झाली आहे. पण त्याबाबत मुंबई पोलीस फारसे गंभीर नसल्याचे दिसत आहे. बेपत्ता होणाऱ्यांमध्ये स्मृतिभ्रंश झालेले, वयोवृद्ध, अपंग आदींचे प्रमाण ५ टक्के आहे. उर्वरितांमध्ये बहुतांश जण १८ ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. त्यांचा वापर देहव्यापारात, आखाती देशात वेश्याव्यवसाय आणि घरकामासाठी होतो. गेल्या दोन वर्षांत १०५२ महिला बेपत्ता झाल्या असून अशा कामांसाठी त्यांना अडकविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तोच प्रकार अल्पवयीन मुले आणि मुलींच्या बाबतीत आहे. २०११ पासून ६४५ मुले, मुली बेपत्ता झाल्या आहेत. ९० टक्के प्रकरणात लहान मुलांची किडनी काढून घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यासाठी आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या टोळ्या मुंबईत कार्यरत आहेत.
अशी पळवतात मुले
मुले कशी बेपत्ता होतात आणि पळविली जातात त्यासाठी एक उदाहरण बोलके ठरावे. मुंबईतील एका आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचा हा किस्सा. १८ वर्षांचा त्याचा नातेवाईक मुलगा मुंबईत आला. कल्याणहून बस  पकडून तो मुंबईला येणार होता. बसला वेळ होता म्हणून तो दुकानात गेला. तेथून निघत असताना त्याच्या समोर असलेल्या व्हॅनमधून उतरलेल्या दोघांनी त्याच्या नाकाला रुमाल लावून गाडीत कोंबले. त्याला जेव्हा जाग आली तेव्हा रात्र झाली होती. गाडी सुरू होती आणि चालक आणि एकजण समोर बसला होता. तर मागच्या सीटवर दोन मुली बेशुद्ध अवस्थेत होत्या. या तरुणाने झोपेचे सोंग घेतले. काही अंतरावर गाडी थांबली तेव्हा प्रसंगावधान दाखवत त्याने दार उघडले आणि तो पळून गेला. दैव बलवत्तर म्हणून त्याची सुटका झाली. पण त्या अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही की गाडीत असलेल्या त्या दोन मुलींचे काय झाले तेही समजले नाही. बेपत्ता झालेल्या लोकांची वाढती संख्या पाहून उच्च न्यायालयानेही पोलिसांना फटकारले आहे. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. पण त्यात फारशी प्रगती झालेली नाही.देशाच्या कानाकोपऱ्यातून पळवून, फूस लावून आणलेली मुले, महिला मुंबईत आहेत. पण मुंबईतून बेपत्ता झालेले अनेक जण देशाच्या कानाकोपऱ्यात, आखातात लुप्त झाले आहेत. स्वत:च्या सुटकेसाठी त्यांची असहाय्य धडपड सुरू असेल, त्यांच्या पालकांचा आक्रोश सुरू असेल. पण पोलीस आणि सरकार फार गंभीर दिसत नाहीत. ‘हाय प्रोफाईल’ केस असेल तर पोलीस अपार मेहनत करतात, पण सर्वसामान्य घरातील बेपत्ता मुले, मुली आणि महिलांसाठी फारसे प्रयत्न झालेले दिसत नाही.
————————————————–
बेपत्ता        १०११        २०१२        २०१३
————————————————-
लहान मुले    १४१    १२७        ३०
मुली        १३६        १७४        ३७
पुरुष        ५७५        ५९६        १६०
महिला               ७४४        ५५८        ११७
————————————————-
एकूण        १३२९        १४५५        ३३४
————————————————-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:10 am

Web Title: where are the missing childrens and womens
Next Stories
1 आयटम साँग करणारच
2 झोपडय़ा पाडण्याचा फार्स!
3 महापौर पुरस्कारांची खिरापत :
Just Now!
X