बेस्टच्या बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो मुंबईकरांना सध्या एकाच प्रश्नाने भेडसावले आहे, ‘बसथांब्यावर आलेली बस नेमकी कुठे जाणार आहे?’ बेस्टच्या बहुतांश बसगाडय़ांवरील गंतव्यस्थानाचे फलक सध्या नामशेष झाल्याने एखादी बस येताना दिसली की, ‘भाऊ, बस चाललेय कुठे?’ असा पुकारा होत असल्याचे चित्र आहे. त्यातून बऱ्याचदा प्रवासी आणि वाहक यांची शाब्दिक चकमक होण्याचे प्रसंगही घडतात. परिणामी, प्रवाशांना खूपच अडचणीचा सामना करावा लागत असल्याची टीका समिती सदस्यांनी बेस्ट समितीच्या सभेत केली. अशा गाडय़ांची संख्या खूप मोठी असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी सूचनाही सदस्यांनी केली आहे.
तंत्रज्ञानाच्या आधारे जग पुढे जात असताना आशिया खंडातील सर्वात मोठा परिवहन उपक्रम म्हणवणारी बेस्ट अजूनही गंतव्यस्थानाच्या फलकाबाबत कापडावर अवलंबून असल्याचे प्रशासनातर्फेच स्पष्ट करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक फलक असलेल्या बसची संख्या मर्यादित असून ते फलकही वारंवार नादुरुस्त असल्याने प्रवाशांच्या हालात भरच पडते आहे. या गोष्टींनाही या सभेत वाचा फुटली.
बेस्ट भवनमध्ये सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेत गंतव्यस्थानाचे फलक लावण्यासाठी कापडाची खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव चर्चेसाठी आला होता. त्या वेळी समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी फलकांची दुर्दशा आणि प्रशासनाची अनास्था याबाबत आपली मते मांडली. गोरेगाव भागातील बहुतांश बसगाडय़ांवर गंतव्यस्थानाचे फलक लावलेले नसतात. काचेवर खडूने गंतव्यस्थान लिहिणे, पत्र्याच्या तुकडय़ावर लिहून तो तुकडा टांगणे अशा प्रकारच्या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात, याबाबत गणाचार्य, याकुब मेमन आणि केदार होंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली.
बेस्टच्या अगदी थोडय़ाच गाडय़ांवर इलेक्ट्रॉनिक फलक बसवण्यात आले आहेत. हे इलेक्ट्रॉनिक फलक सर्वच गाडय़ांवर बसवणे आवश्यक आहे. त्याशिवाय गंतव्यस्थानाच्या फलकाबाबत सुसूत्रता असणे आवश्यक आहे, असे होंबाळकर यांनी स्पष्ट केले. तर, जग पुढे जात असताना बेस्ट प्रशासनाने पुन्हा कापडी फलकांकडे वळणे योग्य नसल्याचे याकुब मेमन यांनी सांगितले. सदस्यांच्या आक्षेपांना आणि सूचनांना उत्तर देताना बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी कापडी फलकाला सध्या पर्याय नसल्याची भूमिका घेतली. ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत आलेल्या आणि वातानुकूलित अशा ८०० बसगाडय़ा वगळल्या तर प्रशासनाच्या इतर ३२०० बसगाडय़ांना इलेक्ट्रॉनिक फलक बसवणे अव्यवहार्य आहे. त्याऐवजी कापडी फलकाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच ८०० गाडय़ांमधील इलेक्ट्रॉनिक फलक बिघडल्यानंतर अशोका लेलॅण्ड या कंपनीकडून आता त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी काळात सर्व बसगाडय़ा गंतव्यस्थानाच्या फलकासहच दिसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बसच्या स्वच्छतेमुळे इलेक्ट्रॉनिक फलकात बिघाड
बेस्टच्या बसगाडय़ा आतील बाजूनेही पाण्याने धुतल्या जातात. अशोका लेलॅण्डतर्फे बसवलेले इलेक्ट्रॉनिक फलक वॉटरप्रूफ (जलरोधक) नसल्याने त्यात पाणी जाऊन ते बिघडले होते. ही बाब संबंधित कंपनीच्या निदर्शनास आणून देण्यात आली. काही फलकांसाठी बेस्टच्या स्वच्छता प्रणालीत बदल करणे योग्य नसल्याचे त्यांना पटवून दिल्यावर या कंपनीने हे फलक दुरुस्त करून त्याचे वार्षिक देखभाल दुरुस्तीचे कंत्राट करण्याचे मान्य केले आहे, असेही महाव्यवस्थापक गुप्ता यांनी स्पष्ट केले. आता ८०० पैकी ४५० बसगाडय़ांमधील फलक दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून येत्या चार महिन्यांत सर्व बसगाडय़ांमधील फलक सुरू होतील, असेही ते म्हणाले.