महाराष्ट्र वेगाने बदलतो आहे. या बदलाचा मागोवा घेण्याचे शिवधनुष्य ‘लोकसत्ता’ने उचलले. त्यातही या मालिकेत शिक्षण या विषयाला सर्वोच्च प्राधान्य दिले. राज्यभरातील तज्ज्ञांच्या मांदियाळीच्या सक्रिय सहभागाने आणि साक्षीने होणाऱ्या या मंथनातून काही निश्चित आणि भरीव निष्पन्न होईल, असा ठोस आशावाद शुक्रवारी सकाळी कफ परेडच्या ‘ताज प्रेसिडेंट’च्या लाऊंजमध्ये जमलेल्या शिक्षण क्षेत्रातील सुमारे शंभराहून अधिक तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.
‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत ‘शिक्षणात महाराष्ट्र कुठे?’ या दोन दिवसांच्या राज्यव्यापी परिसंवादाला शुक्रवारी सकाळी ताज प्रेसिंडेटमध्ये उत्साही वातावरणात सुरुवात झाली. सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी उद्घाटनपर भाषणात भविष्याचा वेध घेण्यासाठी शिक्षण क्षेत्राने काय करायला हवे याविषयी निर्भिडपणे केलेले विचारप्रवर्तक भाष्य आणि पाठोपाठ ‘सिम्बॉयसिस’ या शिक्षणसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी शिक्षणक्षेत्रात जागतिक पातळीवरील परिस्थितीचा कॅनव्हास उभा करून सध्या देशाची आणि राज्याची स्थिती कशी आहे आणि सध्याच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी तंत्रज्ञानाची कास कशी धरावी लागणार याचे अनुभवजन्य मार्गदर्शन केले. या दोघांनी सुरुवातीलाच संपूर्ण परिसंवादाला एक भारदस्तपणा आणि गांभीर्य मिळवून दिले. मग पाठोपाठ झालेले तीन परिसंवाद कार्यक्रमाचा दर्जा उत्तरोत्तर वाढवत नेणारे ठरले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन हा या परिसंवादांचा मुख्य हेतू होताच. परंतु त्यांच्याशी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करणे, नव्या कल्पना ऐकून घेणे, त्याबाबत गप्पा, चर्चा करणे याचेही तेवढेच महत्त्व होते. कार्यक्रमाची आखणीही त्यानुसार करण्यात आली होती. दोन सत्रांच्या दरम्यान राज्यभरातून जमा झालेली शिक्षणक्षेत्रातील ही मांदियाळी हाती चहाचा कप घेऊन गहन परंतु खेळीमेळीच्या चर्चेत सुहास्य मुद्रेने रंगून जात होती आणि सत्र सुरू झाल्याचे सांगणारी ‘शाळेची घंटा’ वाजल्यावर लगबगीने सभागृहात पोहोचत होती. सकाळपासून जमलेली ही सगळी मंडळी पाचही सत्रांमध्ये सहभागी झाली होती. उद्घाटनाइतकीच उपस्थिती समारोप सत्रालासुद्धा होती यातूनच पहिल्या दिवसाचे फलित स्पष्टपणे जाणवत होते. चर्चासत्राइतकाच रंगलेला आणखी एक कार्यक्रम म्हणजे प्रत्येक सत्रानंतरची प्रश्नोत्तरे. किंबहुना हा एकप्रकारे संवादच झाल्याने मार्गदर्शकांनाही ठरलेल्या विषयांबाहेरही अनेक मुद्दय़ांना स्पर्श करता आला. दिवसभराच्या पाच सत्रांच्या भरगच्च बौद्धिक मेजवानीनंतर मंडळी तृप्त मनाने परस्परांना निरोप देत निघाली ती शनिवारी सकाळी लवकर येऊन जागा पकडण्याचा बेत मनाशी ठरवूनच!