मुंबईत दररोज आठ ते नऊ गुन्ह्य़ाची नोंद होत असून त्यामध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या तीन ते चार घटनांचा प्रामुख्याने समावेश आहे. या गुन्ह्य़ांमध्ये गेल्या महिन्याभरात कमालीची वाढ झाल्याने मुंबईकर धास्तावले आहेत. मोटरसायकलवरून येऊन सोनसाखळी खेचण्याऐवजी आता थेट घरात घुसून वा मार्केटमध्ये कानशिलात लगावून चोरी करण्याएवढी चोरटय़ांची हिंमत वाढल्याचे दिसून येत आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांचा वचकच या गुन्हेगारांना राहिलेला नाही, असेही वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
गेल्या महिन्याभरात एकूणच गुन्ह्य़ांमध्ये झालेली वाढ रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. या घटना पाहता गुन्हेगारांवर पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येते. ५ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील पेरी क्रॉस रोडवर परदेशी तरुणी राहत असलेल्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्याची घटना घडली. चोरीच्या उद्देशाने घरात शिरून तिच्यावर बलात्कार करणारा मोहम्मद अली अन्सारी उर्फ बादशाह हा चार दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून आलेला कुख्यात गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले.
एकीकडे अंडरवर्ल्डच्या कारवाया थंडावल्या असल्या तरी मोठे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे मुंबई परिसरात वाढले आहेत. सध्या भुरटय़ा चोरांचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. सध्या मुंबईत दररोज सरासरी चार ते पाच मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावरुन फिरणे महिलांना धोकादायक बनले आहे. सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी विशेष पथके, नाकाबंदी, सीसीटीव्ही कॅमेरे लावूनही सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झालेल्या दिसून येत नाही.

* ज्येष्ठ नागरिक असुरक्षित
ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या रोखण्यासाठी पोलिसांनी आपल्या परिसरातील वरिष्ठ नागरिक दत्तक घेण्याची योजना सुरू केली. मोठा गाजावाजा करुन गृहमंत्र्यांनी या योजनेचा आरंभही केला. परंतु त्यानंतरही दोन ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आली. घाटकोपर येथे एका कुरियर बॉयने वयोवृद्ध महिलेची घरात घुसून हत्या केली. तर ५ नोव्हेंबरला मालाड येथे निर्मला व्होरा यांचीही चोरीसाठी घरात घुसून हत्या करण्यात आली. एकटे राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची नोंद पोलिसांकडून केली जात आहे. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पोलीस घरी जात असतात. परंतु बऱ्याच प्रमाणात अशी नोंद करण्यास वयोवृद्धच पुढे सरसावत नसल्याचे पुढे आले आहे. ज्येष्ठांच्या समस्यांसाठी पोलिसांची स्वतंत्र हेल्पलाइनही आहे. मात्र अशा नागरिकांनाच लक्ष्य केले जात आहे.

*  गुन्हेगार मोकाट
चोरी किंवा हत्या यांसारखे गंभीर गुन्हे हे केवळ रात्रीच्या अंधारात होतात, हा समज चुकीचा आहे. एटीएम लुटणे, भररस्त्यात गोळीबार करून लुटणे तसेच निर्घृण हत्या यांसारखे गुन्हे भरदिवसा घडलेले आहेत. दादरच्या गजबजलेल्या भवानी शंकर रोडवर मल्लिपतन तेवर या इडली विक्रेत्याची भर सकाळी साडेअकरा वाजता चौघांनी चॉपरचे वार करून हत्या केली. तर जेजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टाकी येथे सकाळीच कोकणातून आलेल्या व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला. लुटीसाठी आलेल्या त्रिकुटाने तर गोळीबार करून आपल्या सहकाऱ्याची सुटका करुन घेतली. मेघदूत पुलावर भर दुपारी टॅक्सी अडवून एनआयबीआर बुलियन कंपनीची ४५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आली. गोळीबाराच्या इतरही घटना महिनाभरात घडल्या आहेत. ३० ऑक्टोबर रोजी हॉटेल व्यावसायिक बी जे शेट्टी याच्यावर वर्सोवा येथे गोळीबार करण्यात आला. तर २५ ऑक्टोबर रोजी शिवडी येथे समीना खान या महिलेवर तिच्या प्रियकराने गोळया झाडून तिची हत्या केली.

* अर्भक चोरीचेही आव्हान
तान्’ाा बाळांच्या चोरीच्या वाढत्या घटनांनीही पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातून सागर नावाच्या ४ वर्षांंच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. तर २४ ऑक्टोबरला परळच्या वाडिया रुग्णालयातून अवघे १ दिवसाचे बाळ पळवून नेण्यात आले. माहिम पुलावरुन ४ वर्षांंच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. परंतु तेथील रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला होता. ८ ऑक्टोबरला पवन एक्सप्रेसमधून एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने प्रवाशांनी दोन्ही चोरांना रंगेहाथ पकडले. एकीकडे लहान मुलांच्या चोरीच्या घटना वाढत असताना २२ ऑक्टोबर रोजी भांडुप आणि कांजूर रेल्वेमार्गाच्या दरम्यान २ वर्षांंच्या चिमुरडीला फेकून तिची हत्या करण्यात आली.

*  छेडछाडीतही वाढ
भररस्त्यात मुलींना गाठून त्यांच्यावर हल्ला होण्याच्या तीन घटना मागील दीड महिन्यात घडल्या आहेत. डीएन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुहू गल्ली येथे छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणीवर स्थानिक गुंडाने ब्लेडने वार करून तिला जखमी केले होते. तर परळच्या केईएम रुग्णालयासमोर सकाळी ११ वाजता मोना चौधरी या महाविद्यालयीन तरुणीवर तिच्या मित्राने ब्लेडने हल्ला घडवून आणला होता. पाठोपाठ काही दिवसांनी, ७ नोव्हेंबरला वरळी येथे आर्याका होस्बेटकर या तरुणीवर तिच्या प्रियकराने रसायन फेकून तिला जखमी केले होते.

*  पोलिसांवरील हल्ले
एकीकडे गंभीर गुन्हे घडत असताना पोलिसांवरही हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. नेहरूनगर येथे उशिरापर्यंत चालणारा नवरात्रौत्सव बंद करायला गेलेल्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या दोन हवालदारांवर जमावाने हल्ला केला. तर कुर्ला येथे अदखपात्र गुन्ह्यासंदर्भात आरोपीला बोलवायला गेलेल्या पोलीस शिपायावर आरोपीने चाकूने हल्ला केला. २६ ऑक्टोबर रोजी महिला होमगार्ड उर्मिला आजगावकर यांच्यावर धावत्या लोकलमधून दगडफेक करण्यात आली.
एकीकडे पोलिसांवर हल्ले होत असतांना पोलिसांचा धाकही कमी होत असलेला दिसून येत आहे. २७ ऑक्टोबरला अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी काळाघोडा येथील एका पबवर छापा घालून दीडशे तरुण तरुणींना ताब्यात घेतले होते. परंतु माता रमाई आंबेडकर पोलीस ठाण्यातून हे सर्वजण लीलया फरार झाले. मनसेच्या विद्यार्थी सेना सरचिटणीस अर्चित जयकरने पोलिसांना पोलीस ठाण्यातच दमबाजी करीत या सर्व तरुणांना पळून जाण्यात मदत केली. तर डोंगरीच्या सुधारगृहातून २२ तरुणी त्याच दिवशी फरार झाल्या

मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार प्रमुख महानगरांमध्ये मुंबापुरी आजही सर्वात सुरक्षित समजली जाते. स्कॉटलंड यार्डशी तुलना केल्या जाणाऱ्या मुंबई पोलीसदलाच्या कार्यक्षमतेमुळेच ही सुरक्षितता जाणवते. मात्र, गेल्या काही दिवसांत मुंबईच्या या गौरवाला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. सोनसाखळ्यांची चोरी, ज्येष्ठ नागरिकांवर घरात घुसून चोरी आणि हत्या, बलात्कार, भरदिवसा गोळीबार करून लुटालूट अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांबरोबरच थेट पोलिसांवरही हात उचलण्याच्या घटना आता नित्य घडू लागल्या आहेत. या घटनांमुळे मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा तर पणाला लागली आहेच; पण सर्वसामान्य मुंबईकरांचे जीवनही धोक्यात आले आहे!