गेल्या ६६ दिवसांचे प्राध्यापकांचे बहिष्कार आंदोलन फिके पडले असून प्राचार्याच्या मदतीला सध्या प्राध्यापकच धावून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंदोलन राहिलेच कुठे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात विद्यापीठातील अधिकारीही साशंक नसून प्राध्यापकांचा संप केव्हाच संपल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
प्राध्यापकांनी सर्व प्रकारच्या परीक्षांवर बहिष्कार टाकलेला असून अद्यापही त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र विद्यापीठाने येत्या १२ एप्रिलपासून सुरू परीक्षा घेण्याचे सुतोवा केल्यानंतर महाविद्यालयांना परीक्षेच्या प्रश्नपत्रिका केव्हाच पोहोचत्या केल्या आहेत. एकीकडे परीक्षा घेण्याची प्राचार्यावर टांगती तलवार आणि दुसरीकडे प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे संघटनांच्या नेत्यांचा दबाब यासर्वाना झुगारून आता प्राचार्यानीही विद्यापीठाच्या सुरात सूर मिळवायला सुरुवात केली आहे. एवढे दिवस प्राचार्याचा वरदहस्त प्राध्यापकांवर असल्याने त्यांनीही परीक्षेच्या कामाला संपूर्ण असहकार केला.
मात्र, आता प्राचार्याना केंद्र प्रमुखाची भूमिका बजावणे सक्तीचे आहे आणि प्राध्यापकांशिवाय हे काम शक्य नाही.
दुसरीकडे प्राध्यापकही हे जाणून आहेत की प्राध्यापक संघटनांपेक्षाही महाविद्यालयामध्ये प्राचार्याशी सोबत जास्त करावी लागते. त्यामुळे प्राचार्याच्या इच्छेचा मान आधी राखावा लागेल नंतर एमफुक्टो वगैरे.
बहिष्कार आंदोलनासंबंधी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्याना आंदोलनात सामील असलेल्या प्राध्यापकांची नावे विचारली आहेत. सहसंचालक कार्यालयाला दिलेल्या माहितीमध्ये एकही प्राध्यापक आंदोलनात सामील नसल्याचे महाविद्यालयांच्या प्राचार्याचे म्हणणे आहे. त्यांनी निरंक असे उत्तर कार्यालयाला सादर केले आहे. त्यामुळे प्राध्यापकांचे आंदोलन एमफुक्टोच्या नेत्यांशिवाय फारसे कुठेच सुरू नसल्याचे स्पष्ट होते.