पाणवठय़ावरील पक्षीगणनेचा दुसरा टप्पा
स्थलांतरित पक्ष्यांमध्ये दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘व्हाईट फ्रंटेड गुज’ ३१ डिसेंबरला वन्यजीवप्रेमी विनित अरोरा यांना दिसला होता. पाणवठय़ावरील पक्षीगणनेदरम्यान याच दुर्मीळ पक्ष्याने खापरी तलावावर दर्शन दिले. त्याच वेळी गेल्या काही वर्षांत ‘ब्लॅक स्टॉर्क’ ची संख्या हातांच्या बोटावर मोजण्याइतकी होती. पाणवठय़ावरील पक्षीगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र दहा-बाराच्या संख्येने त्यांनी एक नव्हे, तर दोन-तीन तलावांवर दर्शन दिले. त्यामुळे दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या पक्ष्यांचे दर्शन आणि वाढती संख्या हे एक चांगले सूचक मानले जात आहे.
दहा वर्षांतील सर्वाधिक कमी तापमानाची ५.३ अंश सेल्सिअसची नोंद नागपूरने केलेली असताना या कडाक्याच्या थंडीतही तब्बल ५९ पक्षीनिरीक्षकांनी भल्या पहाटे पाणवठय़ावरील पक्षीगणनेत सहभाग नोंदवला. राज्याच्या वनखात्याने प्रथमच पाणवठय़ावरील पक्षीगणना आयोजित केली. दोन टप्प्यात आयोजित पक्षीगणनेचा पहिला टप्पा २१ डिसेंबरला पार पडला. या पहिल्या टप्प्याच्या दरम्यानही कडाक्याची थंडी असूनही तरुणाईसह ज्येष्ठांची मांदियाळी यात सहभागी झाली होती. दुर्बीण आणि कॅमेऱ्यासह महिला आणि मुलीही सहभागी होत्या. त्यावेळी ३२ तलावांवर पक्षीनिरीक्षकांनी विविध प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद केली. पक्षीगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात थंडीने दहा वर्षांतला निच्चांक मोडलेला असतानाही पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक प्रतिसाद दुसऱ्या टप्प्यातल्या पक्षीगणनेला मिळाला. कमी होत चाललेले ब्लॅक स्टॉर्क हे यावेळचे मुख्य आकर्षण होते. खापरी तलावावर ११ व चारगाव तलावावर १२ च्या संख्येने ते दिसून आले.
गेल्या काही वर्षांत ही संख्या अतिशय कमी झाली होती. वेणा तलावावर तब्बल दोन हजारांच्या संख्येने रेड क्रिस्टेड पोचार्डचा थवा आढळून आला. खापरी तलावावर ३२० बार हेडेड गुजचा थवा दिसून आला. गेल्या अडीच वर्षांत त्यांची नोंद फार कमी होती. दोन वर्षांपूर्वी १२०० च्या संख्येने बार हेडेड गुज होते. पाणवठय़ावरील पक्षीगणनेच्या पहिल्या टप्प्यात पक्ष्यांच्या ८६ प्रजाती आणि तब्बल १३ हजाराहून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातसुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती. विशेष म्हणजे, शिवापूर लेकवर ‘स्पूनमिल’ या पक्ष्याने पक्षीनिरीक्षकांना दर्शन दिले.
पाणवठय़ावरील पक्षीगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात १६ चमूत ५९ पक्षीनिरीक्षक सहभागी होते. तब्बल २८ तलावांवर त्यांनी पक्ष्यांची गणना केली. रामदेवबाबा इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाच्या चमूने वेणा आणि गोरेवाडा तलावावर पक्ष्यांची नोंद केली.
विशेष म्हणजे, यावेळी वनखात्याचे अनेक अधिकारी व कर्मचारीसुद्धा पक्षीगणनेत सहभागी होते. बर्ड्स ऑफ विदर्भ या फेसबुकवरील ग्रुपने पाणवठय़ावरील पक्षीगणनेचे दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पार पाडले.