17 December 2017

News Flash

मुंबई कुणाची.. नोकरदारांची!

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि उद्योगकेंद्र म्हणून ओळखली जात असली तरी तिची खरी ओळख

प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 7, 2013 12:50 PM

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि उद्योगकेंद्र म्हणून ओळखली जात असली तरी तिची खरी ओळख ही ‘नोकरदारां’ची मुंबई अशीच करून द्यायला हवी. कारण, भारतातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत नियमित वेतनावर काम करणारे सर्वाधिक नोकरदार आहेत. मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल ६९ टक्के मुंबईकर नोकरदार आहेत.केंद्रीय नगर विकास विभागासाठी ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ने तयार केलेल्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. या अहवालानुसार कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद या देशातील मोठय़ा शहरांपेक्षा सर्वाधिक जास्त नोकरदार मुंबईत असल्याचे स्पष्ट होते. २००९-१० या वर्षीच्या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुंबई खालोखाल हैदाराबादमध्ये सर्वाधिक नोकरदार (६१.३टक्के) आहेत. तर चेन्नई (५४.२टक्के), बंगळुरू (४७.२टक्के) आणि कोलकाता (३८.५टक्के) येथे नोकरदार आहेत.स्वयंरोजगार करून पोट भरणारे २७.७ टक्के व्यावसायिक मुंबईत आहेत. तर लहानमोठे काम करून उदरनिर्वाह करणारे ३.४ कामगार आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्यांची संख्याही प्रत्येक शहरानुसार वेगळी आहे. सर्वाधिक व्यावसायिक कोलकाता शहरात असून त्या खालोखाल बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद या ठिकाणी व्यावसायिक आहेत. सर्वात कमी व्यावसायिक अर्थातच देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईत (२७टक्के) आहेत, असे हा अहवाल सांगतो.
नोकरदारांची संख्या
शहर – टक्के
मुंबई- ६९
हैदराबाद – ६१.३
चेन्नई – ५४.२
बंगळुरु – ४७.२
कोलकाता – ३८.५

व्यावसायिक
शहर – टक्के
कोलकाता – ४५
बंगळुरु – ३८
मुंबई – २७

First Published on February 7, 2013 12:50 pm

Web Title: who are owners of mumbai labourer