स्त्रीभ्रूण हत्येसाठी डॉक्टरांना जबाबदार धरले जाते. प्रकरण उघडकीस आले की, डॉक्टरांवरच आरोप होतात, पण अशा प्रकरणात तितकेच जबाबदार स्त्रीभ्रूण हत्येसाठी डॉक्टरांकडे जाणारे आईवडीलही जबाबदार आहेत, असे परखड प्रतिपादन कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांनी केले.  
विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त विवेकानंद नगर हिवरा आश्रम येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रामराव महाराज म्हणाले की, कोणता डॉक्टर स्त्रीभ्रूण हत्या करण्याकरिता लोकांच्या घरी जातो? उलट आईवडीलच डॉक्टरांकडे जातात. त्यांच्या केबिनमध्ये जाऊन दरवाजा बंद  करतात. कितीही पैसे द्या, पण डॉक्टर एवढे काम करा, असे सांगतात. त्यामुळे सर्वस्वी डॉक्टरांना याविषयी जबाबदार धरणे चुकीचे आहे. ज्या माऊलीच्या पोटात स्त्रीचा गर्भ असतो आणि ती गर्भ पाडण्यासाठी पतीच्या हो ला होकार देते आणि दवाखान्यात जाते त्यावेळी तिने विचार करावा की, २३ वर्षांपूर्वी तिच्या आईने असाच विचार केला असता तर ती आज जगात असती का? मुलाला श्रेष्ठ म्हणता, मग इंदिरा गांधी कोण होत्या? मुली पुरुषांच्या पुढेच आहेत. मुलांनी घराबाहेर काढले, पण मुलींनी आईवडिलांना सांभाळल्याची भरपूर उदाहरणे आहेत. याची दखल घेणे काळाची गरज आहे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
स्त्रीभ्रूण हत्येचे विदारक चित्र बदलण्याची शक्ती कीर्तनकार व व्याख्यात्यांमध्ये आहे. आज महाराष्ट्रात पाच हजार छोटे मोठे कीर्तनकार आहेत. त्यांनी प्रत्येक कीर्तनात किमान दोन मिनिटे जरी स्त्रीभ्रूण हत्येवर समाजप्रबोधन केले आणि त्यातून दोन व्यक्तींवर जरी परिणाम झाला तरी काही हजार मुली वाचतील, असेही ते म्हणाले.
जगातील सर्व आश्रमात गृहस्थाश्रम सर्वात श्रेष्ठ आहे. त्यामुळे संसारापासून दूर पळू नका. त्यात आनंद आणा आणि कर्तव्ये पार पाडत संसार करा. माणूस कितीही मोठा झाला तरी संसार कसा करावा, हे पाखरांकडून शिकावे. देव देव करून दिवस घालवण्यापेक्षा दिवसातून एकदा तरी देवाचे नाव ह्रदयातून घेतले की परमार्थ साधता येतो. घाईने करायचा तो परमार्थ आणि कितीही केला तरी संपणार नाही म्हणून सावकाश करायचा तो संसार.
निसर्गाने कितीही अन्याय केला तरी त्यापुढे पराभव पत्करू नका. शेतात कमी उत्पन्न होत असेल तर जोडधंदा करा, पण इच्छाशक्ती कायम ठेवा. शेतकऱ्यांनो, पांडूरंगाची शपथ आहे. आत्महत्या करू नका, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन गजानन शास्त्री यांनी केले.