ठाणे-मुंबईच्या वेशीवर मॉडेला मिलच्या विस्तीर्ण अशा भूखंडावर ठाणे शहरातील चौथे नाटय़गृह उभारण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा प्रस्ताव काहीसा वादग्रस्त ठरू लागला असून वाहनतळाच्या आरक्षणाला फाटा देत या ठिकाणी नाटय़गृह उभारणे खरेच आवश्यक आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. येथील मोकळ्या भूखंडावर स्पोर्ट्स सिटी उभारण्याचा प्रस्ताव मुलुंडमधील एका प्रथितयश विकासकाने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेकडे सादर करण्याची तयारी चालवली आहे. या ठिकाणी कॅन्सर रुग्णालयासाठी आरक्षण असावे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. असे असताना रुग्णालयाऐवजी नाटय़गृहाचे घोडे पुढे दामटत सत्ताधारी नेमके कुणाचे हित साधू पाहत आहेत, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. 

ठाणे महापालिकेमार्फत तलावपाळी परिसरात राम गणेश गडकरी आणि घोडबंदर परिसरात डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह चालविले जाते. नाटकांच्या प्रयोगासाठी गडकरी नाटय़गृहाला निर्मार्त्यांकडून मोठी मागणी असल्याचे दिसून येते. येथील नाटकांना रसिकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद लक्षात घेता गडकरी नाटय़गृहाच्या तारखा मिळविण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरू असते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहास तुलनेने अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. ठाण्याच्या पश्चिमेकडे झपाटय़ाने वाढणाऱ्या लोकवस्तीसाठी हे नाटय़गृह पूरक ठरू शकेल, असा दावा महापालिकेमार्फत केला जात होता. त्यामुळे या ठिकाणी नाटकांचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत यासाठी महापालिका व्यवस्थापनामार्फत कसोशीने प्रयत्न होताना दिसतात. असे असले तरी या प्रयत्नांना अद्याप अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही. असे असताना शहरात चौथ्या नाटय़गृहाचे नियोजन करत सत्ताधारी शिवसेना नेमके काय साधत आहे, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

कळव्यातही नाटय़गृह
गडकरी आणि घाणेकर नाटय़गृहापाठोपाठ कळव्यातही नाटय़गृह उभारण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. कळवा, खारेगाव, मुंब्रा परिसरातील नाटय़रसिकांसाठी एखादे नाटय़गृह उभारावे यासाठी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आग्रह धरल्याने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात आयुक्त असीम गुप्ता यांनी या ठिकाणी नाटय़गृह उभारण्यासाठी तरतूद केली आहे. यासाठी मैदानाचे आरक्षण बदलाच्या प्रस्तावावर राज्य सरकारने मंजुरीची मोहर उमटवली आहे. त्यामुळे कळव्यात नाटय़गृह उभे राहणार हे स्पष्ट आहे. ठाणे-कळव्यापासून मोजक्या किलोमीटरच्या अंतरावर ऐरोली परिसरात नाटय़गृह उभारण्याची तयारी नवी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहातील नाटय़प्रयोगांना रसिकांचा अपेक्षित प्रतिसाद नसताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहापोटी ऐरोलीत नाटय़गृहाची उभारणी केली जात आहे. मुलुंड परिसरातील कालिदास नाटय़गृहातील प्रयोगांना आता पूर्वीइतका प्रतिसाद मिळत नाही. असे असताना याच परिसरात आणखी एक नाटय़गृह उभारणे योग्य ठरेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कॅन्सर रुग्णालय का नको?
ठाणे महापालिका प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावानुसार येथील मॉडेला मिलच्या जागेवर कॅन्सर रुग्णालय उभारावे, असे म्हटले आहे. ठाणे महापालिकेच्या मूळ विकास आराखडय़ात या जागेवर वाहनतळाचे आरक्षण होते. येथील एका प्रथितयश विकासकाच्या माध्यमातून येथील सुविधा भूखंडावर वाहनतळ उभारण्याचा तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांचा प्रयत्न होता. मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या रेन्टल हाऊसिंग योजनेअंतर्गत या ठिकाणी स्पोर्टस् सिटी उभारण्याचा प्रस्ताव एका बडय़ा विकासकाने सादर केला आहे. त्यामुळे सुविधा भूखंडावर कॅन्सर रुग्णालय उभारण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावामुळे अनेकांची भंबेरी उडाली आहे. असे असताना कॅन्सर रुग्णालयासाठी हा भूखंड उपयुक्त नाही असा दावा करत थेट नाटय़गृहाचा प्रस्ताव पुढे आणून सत्ताधारी शिवसेनेने नवा वाद ओढवून घेतला आहे.
वागळे परिसरात महापालिकेच्या माध्यमातून एकही मोठी वास्तू उभी राहिलेली नाही. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांसाठी नाटय़गृहासारखी सांस्कृतिक वास्तू उभी राहत असेल तर कुणाला हरकत असण्याचे कारण काय, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. कॅन्सर रुग्णालय तसेच संशोधन केंद्रासाठी मॉडेला मिलचा भूखंड कमी पडेल. त्यामुळे ग्लॅडी अल्वारिस मार्गावरील भूखंड रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे वेगळे अर्थ काढणे गैर आहे, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.