प्रचाराचा धुराळा संपल्यानंतर व मतदान सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच नागपूर जिल्ह्य़ातील सहा मतदारसंघात पुढे कोण? आणि मागे कोण? याचीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, तिरंगी व चौरंगी लढतीत मतविभाजानाचा नेमका फायदा कुणाला होणार, याचा तर्क लावणेही आतापासून सुरू झाले आहे. या प्रश्नाचे उत्तर १९ ऑक्टोबरला मिळणार असले तरी दावे आणि प्रतिदावे होऊ लागल्याने राजकीय विश्लेषकही बुचकळ्यात पडले आहेत.
जिल्ह्य़ात रामटेक आणि हिंगणा या दोन मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. रामटेकमध्ये विद्यमान आमदार सेनेचे आशिष जयस्वाल, काँग्रेसचे सुबोध मोहिते, भाजपचे मल्लीकार्जुन रेड्डी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल देशमुख यांच्यातच अटीतटीची झुंज होत आहे. या चौघांनाही विजयाची आशा आहे. मनसेचे वाडीभस्मे आणि स्वतंत्र उमेदवार संजय सत्यकार हे सुद्धा भाग्य अजमावत आहेत. रेड्डी हे पहिल्या क्रमांकावर चालत असल्याची चर्चा आहे. सध्या विद्यमान आमदार जयस्वाल यांच्याविरोधात मतदारांची नाराजी दिसून येत आहे. त्याचा फटका त्यांना बसू शकतो. काँग्रेसचा एक गट डॉ. अमोल देशमुख यांच्यासोबत आहे. त्यामुळे ते काँग्रेसचे किती मते खेचू शकतात, यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
हिंगणा मतदरासंघातही चौरंगी लढती होत आहेत. परंतु शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे रमेश बंग आणि भाजपचे समीर मेघे यांच्यातच खरी लढत आहे. काँग्रेसच्या कुंदा राऊत आणि सेनेचे प्रकाश जाधव हे स्पर्धेतूनच बाहेर पडले आहेत. मोदी लाट आणि भाजप कार्यकर्त्यांचे संघटन या बळावर समीर मेघे तरुण जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु काही समीक्षक हे मान्य करायला तयार नाहीत. यावेळी बंगच निवडून येतील, असा हमखास दावा केल्या जात आहे. काटोलमध्येही चौरंगी लढती होत आहेत. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, भाजपचे आशिष देशमुख, सेनेचे राजेंद्र हरणे आणि शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख यांचा समावेश आहे. प्रचारामध्ये अनिल देशमुख पहिल्या क्रमांकावर, आशिष देशमुख दुसऱ्या तर हरणे तिसऱ्या क्रमांकावर होते. हरणे यांच्याविषयी सहानुभूती दिसून येत असून त्यांचा नरखेड तालुक्यात बोलबाला आहे. काम करणारा तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. दोन देशमुखांच्या लढतीत ते किती मते खेचतात, यावर त्यांचे मुंबईचे तिकीट अवलंबून आहे. राहुल देशमुख काटोल शहरापुरतेच मर्यादित ठरले आहेत.
सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार आणि शिवसेनेचे विनोद जीवतोडे यांच्यात अटीतटीची लढत आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणामुळे केदारांच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. सोमवारी काढलेल्या त्यांच्या मिरवणुकीला प्रतिसाद लाभल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सावनेर तालुक्यातील खापा, खापरखेडामध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कळमेश्वर आणि मोहपा परिसरात मात्र तेवढाच तीव्र विरोध दिसून येत आहे. तर दुसरीकडे जीवतोडे यांच्याबरोबर भाजपचे  कार्यकर्ते किती जीव तोडून काम करतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असले तरी त्यांच्याविषयी मतदारांची सहानुभूती दिसून येत आहे. तसेच राष्ट्रवादीचे किशोर चौधरी हे सुद्धा दंड ठोकून उभे असून ते जेवढे मते घेतील, तेवढाच लाभ जीवतोडे यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.
कामठीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हेच बाजी मारतील, असे छातीठोकपणे सांगितले जात आहे. काँग्रेसचे राजेंद्र मुळक हे बाहेरचे असल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे तापेश्वर वैद्य जेवढी मते खेचतील तेवढाच लाभ मुळक यांना होऊ शकतो. अन्य उमेदवार फारसे स्पर्धेत नाही. उमरेडमध्ये मात्र कोण विजयी होईल, हे ठामपणे सांगता येत नाही. विद्यमान भाजपचे आमदार सुधीर पारवे हे गेल्या निवडणुकीप्रमाणेच लाटेत स्वार होऊ, असे स्वप्न
बघत आहेत. त्यांना पक्षातीलच असंतोषाला तोंड द्यावे लागत असून अपक्ष राजू पारवे, सेनेचे ज.मो. अभ्यंकर, राष्ट्रवादीचे रमेश फुले चांगली लढत देत आहे. काँग्रेसचा उमेदवार प्रचारात अगदी मागे पडला आहे. बसपचे रुक्षदास बन्सोड सर्वाचेच गणित बिघडवणार आहेत. ते किती बिघडवणार यावर सुधीर पारवे यांचे भवितव्य अवलंबून आहे.