17 December 2017

News Flash

या दिवाळीत तुम्ही कोणाला खूश करणार?

यंदाची दिवाळी तुम्ही कुणाबरोबर साजरी करणार? मित्रांबरोबर की कुटुंबाबरोबर? दिवाळीत तुम्ही फराळाची देवाणघेवाण करणार

प्रतिनिधी | Updated: November 9, 2012 11:58 AM

यंदाची दिवाळी तुम्ही कुणाबरोबर साजरी करणार? मित्रांबरोबर की कुटुंबाबरोबर? दिवाळीत तुम्ही फराळाची देवाणघेवाण करणार का?  दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही मित्रांना फोन करणार, त्यांना भेटणार की फक्त मोबाईलवरून एसएमएस पाठवणार? या दिवाळीत तुम्ही नेमके काय करणार?, असे कोणी तुम्हाला विचारले तर तुम्ही म्हणाल, ‘अरे काय चाललंय काय? दिवाळी हाच मुळी आनंदाचा सण असतो. दिवाळीची खरेदी, पणत्या-कंदिलांची रोषणाई, रेखीव रांगोळ्या, सुगंधी उटण्याचा वास, दिवाळीच्या पहिल्या पहाटेची आंघोळ, फटाक्यांची आतषबाजी, मिठाई, ताटात दाटीवाटीने मांडलेले लाडू, चकली, करंज्यांचा फराळ, भावाला ओवाळल्यावर ताटात पडणारी ओवाळणी, सगळ्यांचे आनंदाने फुललेले चेहरे आणि स्नेहमिठी मारून मित्रांना दिलेल्या शुभेच्छा.. अशा कितीतरी आनंदाच्या गोष्टी ‘दिवाळी’ या एका शब्दात दडलेल्या असतात.’
.. तरीही, असे प्रश्न विचारण्याची गरज आज महानगरांमध्ये निर्माण झाली आहे, असे एका पाहणीत दिसून आले आहे.
महानगरातील वेगाने बदलत गेलेली जीवनशैली, नोकरी-व्यवसायामुळे दिवाळीतही न मिळणाऱ्या सुट्टया, कॉम्प्युटर-लॅपटॉप-टॅब्लेट आणि मोबाईलसारख्या अत्याधुनिक गॅझेट्समुळे सुट्टीच्या दिवशीही सुरू असणारे काम, शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने दूरदेशात करावे लागलेले वास्तव्य या सगळ्याचा परिणाम कुठेतरी देशातील मुख्य महानगरांमधील तरूण पिढीवर होतो आहे, असा निष्कर्ष ‘इपसॉस’ या मार्केट रिसर्च कंपनीने केलेल्या पाहणीतून निष्पन्न झाला आहे. दिवाळीच्या आधी घराची साफसफाई करून मंगलमय वातावरण निर्माण करणे, आकाशकंदिल बनवण्यापासून दाराबाहेर रांगोळ्या काढणे, पणत्या लावणे अशा कामांमध्ये लहानांनाही सामील करून घेणे, फराळासाठी आठवडाभर आधीपासून पदर खोचून एकत्र कामाला लागलेल्या आई, आजी, मावशी, काकू आणि मग हाच फराळ घेऊन दिवाळीच्या चार दिवसांत मित्र-नातेवाईकांच्या घेतलेल्या गाठीभेटी या सगळ्या गोष्टींमागे आपापसातले हेवेदावे विसरून एकत्र येणे हा महत्त्वाचा उद्देश होता. आता कामाच्या गडबडीत फराळ करायला वेळ नाही म्हणून तो बाहेरून विकत आणला जातो. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सगळ्यांना फोन आणि एसएमएस पाठवून शुभेच्छा दिल्या की उरलेले तीन दिवस घरी बसून दिवाळीचे कार्यक्रम टीव्हीवर पाहणे नाहीतर आराम करणे यावर लोकांचा भर असतो. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात ९१ टक्के लोकांसाठी दिवाळी म्हणजे खरेदी, फटाके, नवीन कपडे आणि मिठाई एवढय़ापुरतीच मर्यादित झाली आहे. तर ७७ टक्के लोकांना दिवाळीतली भेटवस्तूंची देवाणघेवाण महत्त्वाची वाटते तर ७७ टक्के लोकांसाठी घरातले रंगकाम किंवा नूतनीकरण ही दिवाळीतली मोठी गोष्ट वाटते. मात्र, आजही दिवाळी कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, अगदी कामाच्या ठिकाणी किंवा बाजूला रहायला आलेल्या नवीन लोकांबरोबरही साजरी करायला पाहिजे यावर सगळ्यांचे एकमत आहे. मुंबईसारख्या शहरात लोक बऱ्याच प्रमाणात आपल्या नेहमीच्या पानवाल्यापासून रोज कामावर जाताना रेल्वेत भेटणाऱ्या परिचितांबरोबर जोडले गेलेले असतात त्यामुळे दिवाळीसारख्या सणांमध्ये अगदी ८५ टक्के लोक शेजाऱ्यांना, ६४ टक्के लोक आपल्या सहकाऱ्यांना आणि जवळजवळ शंभर टक्के कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला भेट देणे, फराळ वाटणे या गोष्टी महत्त्वाच्या मानतात, असे या पाहणीत दिसून आले आहे.     

बदलत्या जीवनशैलीचा भाग म्हणून मोबाईल, ईमेल-एसएमएस, फेसबुक या गोष्टी अपरिहार्य म्हणून लोकांनी स्वीकारल्याचेही या पाहणीत दिसून आले आहे. ज्या मित्रांना, लोकांना भेटणे शक्य नाही अशांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुक किंवा चॅटिंग हे पर्यायी माध्यम आहे असे ५६ टक्के लोकांना वाटते तर ३७ टक्के लोकांसाठी सगळे मित्र एका शहरात राहत असले तरी त्यांना वारंवार भेटणे शक्य नसल्याने एफबी हा संवादाचा धागा जोडणारा दुवा आहे. आणि तरीही ५६ टक्के लोकांनी आपण काही प्रमाणातच या माध्यमांवर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले आहे. भरल्या घरातही एकटे असणारे आणि एकटे असूनही सगळ्यांत रमणारे असा विरोधाभास जवळपास सगळ्याच महानगरांमध्ये आहे. तेव्हा आपला एखादा जिवलग असावा, ही आजही ७५ टक्के लोकांची गरज आहे. त्यामुळे आजूबाजूच्या प्रत्येकाशी आपले चांगले संबंध असलेच पाहिजेत हा ९१ टक्के लोकांचा असलेला आग्रहच आजही दिवाळीच्या सणात अवघाचि आनंद भरून टाकतो आहे.

First Published on November 9, 2012 11:58 am

Web Title: whom you want to do happy in this diwali