वाशीम जिल्ह्य़ातील सर्व कुटुंबांचे आधार कार्ड काढणे अद्यापही झाले नसल्याने शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी प्रशासनाने आधार कार्डाची सक्ती करू नये, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी आणि जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांना देण्यात आले.
या निवेदनात शिवसेनेच्यावतीने राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या १३ सप्टेंबर २०१२ च्या परिपत्रकानुसार राज्यातील मुंबई व मुंबई उपनगरे, वर्धा, अमरावती, पुणे, नंदूरबार व नाशिक या जिल्ह्य़ांमध्ये केरोसीन वितरणातील गैरव्यवहार दूर करण्यासाठी उपाययोजना म्हणून केरोसीन मिळण्यास पात्र असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यांमध्ये केरोसीनवरील अनुदान (सबसिडी) जमा करण्याची योजना पुरस्कृत केली आहे. या योजनेत वाशीम जिल्ह्य़ाचा समावेश नसूनही पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्य़ातील सर्व शिधापत्रिकाधारकांना प्रत्येक शिधापत्रिकाधारकाच्या कुटुंबातील पुरुष व महिला यांच्या संयुक्त नावाने खाते काढण्याचा आदेश काढण्यात आला आहे. जिल्ह्य़ात या योजनेत लाभार्थी असलेल्या एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या ११ लाख ९७ हजार ५०० असून आजपर्यंत जिल्ह्य़ात फक्त ३ लाख ९७ हजार आधार कार्ड काढण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थीकडे आधार कार्डच नसल्याने संबंधित शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्यासाठी त्रास होत आहे. त्यांना यासाठी आधार कार्डाची सक्ती करू नये, असे आदेश जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख, तेल कंपन्यांचे प्रतिनिधी, पुरवठा विभागाला त्वरित द्यावेत, तसेच शिधापत्रिकाधारकांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब देशमुख, युवासेनेचे जिल्हा संघटक रवी भांदुर्गे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगला सरनाईक, उपजिल्हा प्रमुख माणिक देशमुख, दिनेश राठोड, तालुका प्रमुख महादेव ठाकरे, दत्तराव मोरे, रामेश्वर अवचार, दत्ता तुरक, रवी पवार, अनिल राऊत, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, संतोष जोशी, अरुण मगर, राजेश ठाकूर, मनोहर राठोड यांच्यासह जिल्ह्य़ातील शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.