19 January 2018

News Flash

पेडर रोड उड्डाणपुलाला वेगळा न्याय का?

मुंबई व परिसरात आजवर झालेल्या शेकडो महाकाय बांधकामांच्या परिसरात बांधकामामुळे जनतेला त्रास होऊ नये यासाठी कसल्याही सुविधा आजवर मिळालेल्या नाहीत.

प्रतिनिधी | Updated: December 19, 2012 2:12 AM

मुंबई व परिसरात आजवर झालेल्या शेकडो महाकाय बांधकामांच्या परिसरात बांधकामामुळे जनतेला त्रास होऊ नये यासाठी कसल्याही सुविधा आजवर मिळालेल्या नाहीत. मात्र सेलिब्रिटी आणि उच्चभ्रूंचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेडर रोडवरील उड्डाणपुलाच्या बांधकामावेळी अशी काळजी घेण्यासाठी विशेष सोयी करण्याची अट टाकण्यात आल्याने या ‘वेगळय़ा न्याया’च्या भूमिकेबाबत असंतोष निर्माण झाला आहे. प्रकल्पाच्या बांधकामावेळी अशी काळजी घेणे चांगलेच आहे. आता यापुढे मुंबईतील प्रत्येक प्रकल्पाच्या बांधकामावेळी ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण रोखण्याच्या यंत्रणा बसवण्यात याव्यात अशी मागणी पुढे आली आहे.
दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हाजीअली चौकापासून गिरगाव चौपाटीपर्यंत ४.२ किलोमीटर लांबीचा पेडर रोड उड्डाणपूल बांधण्याचा ‘एमएसआरडीसी’चा प्रकल्प गेल्या दशकभरापासून रेंगाळला आहे. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर व आशा भोसले यांनी या उड्डाणपुलास विरोध केला होता. त्यामुळे हा प्रकल्प निष्कारण प्रसिद्धीच्या झोतात आला. नंतर पेडर रोडवरील उच्चभ्रू रहिवासी सातत्याने प्रकल्पाविरोधात सक्रिय राहिले. तीन वर्षांपूर्वी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर जुलै २०११ मध्ये या प्रकल्पासाठी पर्यावरण सुनावणी मुंबईत पार पडली. या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवताना ध्वनिरोधक यंत्रणा बसविणे, रात्रीच्या वेळी काम न करणे, सकाळी ६ ते सायंकाळपर्यंतच फक्त काम करणे, तसेच हवा स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा वापरणे आदी अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे.
मुंबईत आजवर अनेक उड्डाणपूल बांधले गेले. पण त्यावेळी स्थानिक रहिवाशांची इतकी काळजी घेतली गेली नव्हती. आजमितीलाही मुंबईत अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. कुठे मेट्रो, तर कुठे मोनोरेल, कुठे उन्नत मार्ग तर कुठे उड्डाणपूल. या कामांसाठी आणलेल्या यंत्रांचा खडखडाट, उडणारी धूळ, यामुळे मुंबईतील रहिवासी बेजार झाले आहेत. पण त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून एमएसआरडीसी अथवा एमएमआरडीए आदी संस्थांनी पेडर रोड उड्डाणपुलासारखी कळकळ कधी दाखविलेली नाही. पण आता पेडर रोड उड्डाणपुलासाठी विशेष काळजी घेण्याच्या अटी टाकण्यात आल्याने मुंबईकरांमध्ये एकाचवेळी असंतोष व समाधान अशा भावना आहेत.
पेडर रोडचे रहिवासी उच्चभ्रू असल्याने केवळ त्यांच्यासाठी अशा विशेष सुविधा देणे गैर आहे; पण प्रकल्पावेळी लोकांच्या काळजीसाठी सोयी देणे ही चांगली बाब आहे, अशी भूमिका पेडर रोड उड्डाणपूल व्हावा यासाठी सुनावणीत बाजू मांडणारे आमदार प्रकाश बिनसाळे यांनी मांडली. आता यापुढे मुंबईतील पायाभूत प्रकल्पांच्या कामाच्या ठिकाणी स्थानिक लोकांना आवाजाचा, धुळीचा त्रास होऊ नये यासाठी अशा सुविधा राबवाव्यात. त्यामुळे बांधकामावेळी होणाऱ्या त्रासातून सर्वसामान्य मुंबईकरांचीही सुटका होईल व अशी काळजी घेतली जात असल्याने विरोधही कमी होईल, असे बिनसाळे यांनी  सांगितले.

First Published on December 19, 2012 2:12 am

Web Title: why different justice to peddar road bridge
  1. No Comments.