नाइट लाइफ.. लंडन आणि न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबईत एक नवी संस्कृती रुजविण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे. दुकाने, हॉटेल्स, पब्ज, बार, चित्रपटगृहे आदी संपूर्ण रात्रभर सुरू ठेवून महसूल मिळविण्याची आणि रोजगारनिर्मितीची करण्याची कल्पना शिवसेनेच्या युवराजांनी मांडली आहे. ही कल्पना साकार करण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारमधील या पक्षाच्या नेतेमंडळींनी चंग बांधला आहे. मात्र त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांचा विचारच केला गेलेला नाही. चंगळवादी मुंबईकर सोडले तर इतरांसाठी ‘नाइट लाइफ’ डोकेदुखीचा विषय बनण्याची अधिक चिन्हे आहेत.
देशाची आर्थिक राजधानी म्हणून बिरुद मिरविणाऱ्या मुंबापुरीने जगामध्ये आगळे स्थान मिळविले आहे. त्यामुळे विदेशी पर्यटकांसाठी मुंबई आकर्षण बनली आहे. मुंबई जागती असली तरी तिला एक शिस्त आहे. काही कडक नियमांमुळे रात्रीच्या वेळी ठरावीक वाजल्यानंतर मुंबई विसावते. मात्र त्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा जागती असते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पालिकेच्या माध्यमातून ‘नाइट लाइफ’चा प्रस्ताव सादर केला आहे. रात्री उशिरापर्यंत कष्टकरी काम करीत असतात. शेवटच्या गाडीने घरी जाताना मुंबईतील सर्व हॉटेल्स, दुकाने बंद असतात. त्यामुळे त्यांना उपाशी पोटी घर गाठावे लागते. रात्री उशिरा घरी पोहोचल्यानंतर जेवण आटोपून निद्रिस्त होईपर्यंत रात्रीचे दोन वाजतात. त्यामुळे या मंडळींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. दुग्धालये रात्री बंद करण्यात येत असल्यामुळे घरातील दूध संपल्यानंतर चिमुकल्यांची परवड होते. अनेक भागांत रात्री औषधाची दुकाने बंद असतात. त्यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांवर औषधाअभावी बाका प्रसंग उद्भवतो. दिवसभर श्रम केल्यानंतर रात्रीच्या वेळी विरंगुळ्यासाठी कोणतेच साधन मुंबईकरांना उपलब्ध नाही. त्यामुळे भोजनालये, हॉटेल्स, दुग्धालये, औषधाची दुकाने, सिनेमागृहे, जिम्स, स्पा आदी रात्रभर खुले ठेवण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे मुंबई अखंड जागती राहील. भोजनालये, हॉटेल्स, दुग्धालये, औषधाची दुकाने, सिनेमागृहे, जिम्स, स्पामध्ये तीन पाळ्यांमध्ये काम चालवावे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील आणि पालिकेच्या तिजोरीत अधिक महसूल जमा होईल, अशी कल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या एका शिष्टमंडळाने अलीकडेच आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन या कल्पनेला आपला पाठिंबा जाहीर केला.
मुंबईमध्ये आजही पोलिसांच्या आशीर्वादाने ‘नाइट लाइफ’ सुरू आहे. मध्यरात्रीनंतर पबमधून बाहेर पडणाऱ्या मद्यधुंद तरुण-तरुणींचा धिंगाणा काही भागांत सुरू आहे. काही ठिकाणी मध्यरात्रीनंतर आपली भूक भागविण्यासाठी खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवर मुंबईकरांची गर्दी दिसून येते. मध्यरात्रीनंतर कर्णकर्कश हॉर्न वाजवत बेफाट वेगाने धावणाऱ्या मोटारसायकलचा त्रास मुंबईकर आताही सहन करीत आहे. मुंबईत मध्यरात्री घडत असलेल्या या प्रकारांमुळे पोलीस आणि मुंबईकर त्रस्त असतानाच आता ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याची कल्पना पुढे आली आहे. ‘नाइट लाइफ’मुळे चंगळवादाला खतपाणी मिळून मुंबईत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
वाढती गुन्हेगारी, नेते मंडळींना दिले जाणारे संरक्षण, गुन्हेगारांवरील खटल्यांमुळे करावी लागणारी न्यायालयवारी, नाकाबंदी, उत्सव काळात वाढवावी लागणारी गस्त, मोर्चे-आंदोलनांसाठी ठेवला लागणारा बंदोबस्त अशा विविध कामांमध्ये पोलीस व्यस्त आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत तुटपुंजी आहे. मात्र तरीही दिवस-रात्र जागता पहारा ठेवून पोलीस मुंबई सुरक्षित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. आता ‘नाइट लाइफ’ला परवानगी दिल्यानंतर अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांची बळ दुबळे पडण्याची शक्यता आहे. पोलिसांवर कामाचा ताण वाढून त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईत चंगळवाद बोकाळेल, समाजकंटकांचा वावर वाढून मुंबई असुरक्षित बनेल, अशी भीती मुंबईकरांना वाटू लागली आहे. त्यामुळे राज्यकर्ते नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.