आमदार सुरेश जैन यांना घरकुल घोटाळा प्रकरणात अटक होऊन जानेवारीत दहा महिने पूर्ण होतील. इतके दिवस शिवसेनेला जैन यांची अटक राजकीय षड्यंत्र वाटले नाही काय, असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
जैन यांची अटक म्हणजे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी अलीकडे केला होता. त्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
देसाई यांचे म्हणणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.
१९९८पासून सुरू झालेल्या घरकुल घोटाळ्यात महापालिकेचे अतोनात नुकसान होत आहे.
निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुधाकर जोशी व ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी सुनील सोनी यांच्या शासकीय चौकशी समित्यांनी घरकुल घोटाळ्यात कोटय़वधींचा गैरकारभार व भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल दिला आहे. योजनेचे विशेष लेखा परीक्षण करण्यात आले असून त्यातही गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे, हे पाटील यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.
तत्कालीन जळगाव पालिकेत सुरेश जैन गटाचे बहुमत असल्याने घरकुल योजनेचा मक्ता मर्जीतील खांदेश बिल्डर्सला सर्व नियम तुडवून देण्यात आल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.
शिवसेनेला जैन यांची अटक म्हणजे राजकीय षड्यंत्र असल्याचे इतक्या उशिरा का सुचले, असाही प्रश्न पाटील यांनी केला आहे
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 1:38 am