‘हिट अ‍ॅन्ड रन’ प्रकरणी अभिनेते सलमान खान याला न्यायालयाने दोषी ठरविण्यानंतर त्याच दिवशी अंतरिम जामीन मिळाला. तो घरी परतल्यानंतर विविध पक्षांतील राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांनी त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या राजकीय नेत्यांच्या भेटीवर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांनी नाराजी व्यक्त करून त्यांना वंचितापेक्षा सलमानविषयी इतका पुळका का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां लीलाताई चितळे म्हणाल्या, पूर्वी स्वराज्य सुराज्य होण्यासाठी नागरिक घडविणे हा संस्कार होता. त्या संस्कारातून एक मोठी पिढी घडली आहे. मात्र, हा संस्कार मुळात आज दिसून येत नाही. आज माणसापेक्षा व्यक्तीपूजेवर जास्त जोर दिसून येत आहे. कलावंत म्हणून त्याचा समाजाविषयीची दृष्टीकोन जर संस्कारीत नसेल तर तो व्यक्त होत नाही. आज व्यावसायिकरण झाले असून माणसाला माणसाची किंमत राहिली नाही. मानवतेची दृष्टी नष्ट होत चालली आहे. राजकीय नेते किंवा अभिनेत्यांनी सलमानला शिक्षा झाल्यानंतर घरी जाऊन भेटणे हे संस्कृतीला  शोभणारे नाही. सलमानविषयी प्रेम व्यक्त करायचे होते ते त्याला दूरध्वनी करून व्यक्त करता आले असते. मात्र, त्याच्या घरी जाणे आणि आणि प्रसार माध्यमांनी ते प्रसारित करून त्याला सार्वजनिक रूप देणे हे पटणारे नाही. संवेदनशीलता हरपली याचे हे उदाहरण आहे.
माजी कुलगुरू हरिभाऊ केदार म्हणाले, शिक्षा झालेल्या एखाद्या गन्हेगाराच्या घरी जाऊन भेट देणे हे किमान राजकीय नेत्यांना शोभणारे नाही. खरे तर राजकारणी नेत्यांनी माणसांवर प्रेम करणे शिकले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असताना त्यांची हत्या करणाऱ्याच्या घरी आधार देण्यासाठी भेट देतो हे वैयक्तिक पातळीवर पटणारे नाही. मुळात आपल्याकडे आजही व्यक्तीपूजा असून त्याच्या मागे लागलो आहे आणि हा त्या गेलेल्या जीवांचा अपमान आणि त्यांच्यावर केलेला हा अन्याय आहे. त्याला भेटायला जाणाऱ्यांना त्याला सार्वजनिक रूप देऊ नये.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गेव्ह आवारी म्हणाले, सलमान खान हा ‘नॅशनल ऑयकॉन’ आहे. शिवाय त्याने सामाजिक संघटना सुरू करून अनेकांना मदत केली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी त्या भावनेतून भेट दिली असावी. जी घटना घडली होती आणि त्यावरून न्यायालयाने दिलेली शिक्षा ही न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य आणि स्वागतार्ह असली तरी त्याच्याविषयी असलेली सहानभूती व्यक्त करण्यासाठी राजकीय आणि अभिनेते भेटी घेत आहेत. सलमान खानच्या घरी भेट देण्याच्या आधी त्या अपघातामध्ये  ज्यांच्याकडील लोक मारले गेले किंवा जखमी झाले त्यांच्याकडे भेट देणे गरजेचे होते. फूटपाथवर राहणाऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असता.