विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांचा शिक्षण पूरक उपक्रमांमधील सहभाग वाढण्यासाठी अस्तित्वात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ‘विद्यार्थी परिषदे’ची (स्टुडंट्स कौन्सिल) मजल वर्षभरात एखाददुसऱ्या कार्यक्रमाच्या पुढे गेलेली नाही. त्यामुळे, गाजावाजा करून निवडणुकांच्या माध्यमातून अस्तित्वात येणाऱ्या विद्यार्थी परिषदेचे फलित काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.‘विद्यार्थी कल्याण विभागा’च्या माध्यमातून परिषदेने विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न हाताळावे तसेच त्यांचा शिक्षण पूरक उपक्रमांमधील सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. पण, फेब्रुवारी महिन्यात आयोजिण्यात आलेल्या ‘ड्राय होळी’ या उपक्रमाव्यतिरिक्त एकही सांस्कृतिक, सामाजिक वा क्रीडाविषयक उपक्रम परिषदेच्या माध्यमातून झालेला नाही. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनाही प्रतिनिधित्व असावे यासाठी ‘महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमां’नुसार दरवर्षी विद्यार्थी कौन्सिल स्थापन केली जाते. विविध भागातील, स्तरातील विद्यार्थ्यांना या परिषदेवर प्रतिनिधित्व दिले जाते. विद्यापीठाच्या पदव्युत्तर आणि संलग्नित पदवी महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी १५ सदस्यांची निवड करतात. पण, दरवर्षीच परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांचे प्रमाण नगण्य असते. नाही म्हणायला विद्यापीठाचा लोगो असलेले निळ्या रंगाचे ब्लेझर या विद्यार्थ्यांना मिळतात. एरवी कार्यक्रम तर सोडाच; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचीही दखल परिषदेच्या माध्यमातून घेतली गेली आहे किंवा तडीला लावली गेली आहे असे चित्र दिसत नाही. परिषदेच्या या कार्यक्षमतेचे खापर विद्यार्थी सदस्य ‘विद्यार्थी कल्याण विभागा’वर फोडतात. तर विभागाचे संचालक मृदुल निळे यांनी या सगळ्याला परिषदेच्या कामात फारसा रस नसलेल्या विद्यार्थ्यांना जबाबदार धरले. ‘आमच्या बैठका वरचेवर होत नाहीत. इतकेच नव्हे तर कुलगुरुंनीही आमची बैठक घेतली नाही. वर्षभरात ओळखपत्र किंवा सहभागासंबंधातील प्रमाणपत्रही मिळालेले नाही,’ अशी तक्रार परिषदेचा सदस्य केतन इंदुलकर याने केली. तर कुलगुरूंसमवेत एकदाच नव्हे तर दोन वेळा परिषदेची बैठक झाल्याचा दावा निळे यांनी केला. सहभागासंबंधातील प्रमाणपत्रे गेली दहा दिवस तयार आहेत. पण, काही विद्यार्थ्यांनी ती नेण्याचीही तसदी घेतली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परिषदेच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम ठरविला तर अनेकदा विद्यार्थीही फिरकत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली.
विद्यार्थी प्रभावशून्य
विद्यापीठाच्या कारभारात केवळ शिक्षक, कर्मचारी, प्राचार्याच्याच गोतावळ्याचा सहभाग आहे. हे विद्यापीठ ज्यांच्यासाठी आहे त्या विद्यार्थ्यांला येथे प्रतिनिधित्व तर आहे; पण, विद्यार्थ्यांचे हे नेतृत्व प्रभावशून्य कसे राहील याचीच काळजी दरवर्षी घेतली जाते.
ॠषिकेश जोशी, माजी ‘विद्यार्थी परिषद’ सदस्य आणि मनविसेचे विद्यापीठ उपाध्यक्ष