विवाहितेचा हुंडय़ासाठी छळ करून तिला जाळून मारल्याच्या आरोपाखाली तिचा पती आणि सासू या दोघांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काटोल येथील दिवाकर गणपत थोटे (३५) व त्याची आई सुशीलाबाई (६५) अशी आरोपींची नावे असून दिवाकरची पत्नी मंगला थोटे (३०) हिला जाळून मारल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
घटनेच्या चार वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या दिवाकर आणि मंगला यांना तीन वर्षांचा मुलगा होता. मृत्यूसमयी मंगला तीन महिन्यांची गरोदर होती. मंगलाच्या माहेरच्या लोकांनी लग्नाच्या वेळी दिवाकरला हुंडा कबूल केला होता व त्यातील दागिने दिले होते, परंतु रोख रक्कम मात्र ते देऊ शकले नाहीत. यामुळे दिवाकर व त्याची आई मंगलाला नेहमी त्रास देत असत. माहेरून २० हजार रुपये आणून देण्याची मागणी दिवाकर तिला नेहमी करत असे.
२० मार्च २०१० रोजी दारू पिऊन घरी आलेल्या दिवाकरने हुंडय़ाच्या रकमेसाठी मंगलाला मारहाण केली. यावेळी सुशीलाबाईने तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि दिवाकरने तिला पेटवून दिले. यात ९८ टक्के जळालेल्या मंगलाला नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. नवरा आणि सासू यांनी आपल्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने मृत्यूपूर्व बयाणात सांगितले. रुग्णालयातील पोलीस हवालदार, विशेष न्यायदंडाधिकारी आणि काटोल येथील पोलीस अधिकारी अशा तिघांनी तीनवेळा तिचे मृत्यूपूर्व बयाण नोंदवले. या तिन्ही बयाणांमध्ये काही विसंगती दिसत नाही, तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांची पाहणी करता या दोन आरोपींनीच मंगलाला जाळून मारल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला. तो ग्राह्य़ मानून अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांनी दिवाकर व सुशीला या दोघांना जन्मठेप तसेच प्रत्येकी २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील विजय कोल्हे यांनी, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. अशोक भांगडे यांनी काम पाहिले.