राजकीय नेते व सरकारी अधिका-यांनी दारूबंदीचे आंदोलन दडपल्यानंतर उंदीरगाव येथे एका आदिवासी महिलेचा दारूनेच बळी घेतला. दारूच्या नशेत असलेल्या नव-याने अनिता राजू मोरे (वय ३४) या महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले.
 उंदीरगाव येथील झोपडपट्टीत राजू नाना मोरे, त्याची पत्नी अनिता हे राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. वीटभट्टीवर ते मजुरी करतात. राजू मोरे याला दारूचे व्यसन आहे. दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून त्याने पत्नी अनिता हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. ९० टक्के भाजलेल्या अनिता हिला गावातील लोकांनी कामगार रुग्णालयात दाखल केले. औषधोपचार सुरू असताना सोमवारी तिचा मृत्यू झाला. अनिता हिने मृत्युपूर्व जबाब पोलिसांपुढे नोंदविला होता. पती राजू नाना मोरे याने दारूच्या नशेत शिवीगाळ करून रॉकेल ओतून पेटवून दिले असे तिने जबाबात म्हटले होते. पोलिसांनी सुरुवातीला राजू मोरे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न व छळ आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सोमवारी अनिता हिचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
उंदीरगाव, हरेगाव, माळेवाडी व ब्राह्मणगाव वेताळ येथील महिला व कार्यकर्त्यांनी दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. दारूबंदी सुरू केल्यानंतर पोलीस व उत्पादन शुल्क खात्याच्या अधिका-यांकडे तक्रारी केल्या. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार दयाल, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांची भेट घेऊन दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास फुंडकर यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. उलट पोलीस दारू विक्रेत्यांना हाताशी धरून दारूबंदी आंदोलनातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत होते. त्यामुळे चार गावांत संघर्ष सुरु झाला होता. राजकीय नेत्यांनीही  दारूबंदी करणा-या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे आंदोलनाची धार कमी झाली होती. आज दारूने एका महिलेचा बळी घेतला. पोलिसांनी मात्र आरोपी राजू मोरे याने दारूच्या नशेत अनिताला पेटविले याची दखल घेतली नाही. पेटविण्याचे कारणही फिर्यादीत नमूद केले नाही. राजू मोरे याच्याबरोबरच त्याला दारू विकणा-या हातभट्टीच्या चालकावरही गुन्हा नोंदवावा तसेच पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.