घरात बसून राहण्यापेक्षा कामधंदा का करीत नाही, असा जाब विचारण्यावरून झालेल्या कडाक्याच्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर उकळते तेल टाकल्याने त्यात पती गंभीर भाजून जखमी झाला. शहरातील बाळे येथे सकाळी हा प्रकार घडला. पत्नीविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
श्रीशैल टोपण्णा कल्लूरकर (वय ४५) असे या घटनेत भाजून जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या काही दिवसांपासून पायात रॉड घातल्यामुळे श्रीशैल यास कामावर जाता येत नव्हते. त्यावरून पत्नी सुनीता ही त्याच्याशी भांडण करीत असे. घरात बसून राहण्यापेक्षा मार्केट यार्डात जाऊन हमाली करा, असे सुनीता हिने सुनावले. तसेच राहती घरजागा माझ्या नावावर करा, असा तगादाही तिने लावला होता. याच कारणावरून दोघा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रागाने भडकलेल्या सुनीता हिने घरात स्टोव्हवर गरम करण्यासाठी ठेवलेले उकळते पाम तेल पती श्रीशैल याच्या तोंडावर टाकले. त्यामुळे तो गंभीर भाजून जखमी झाला. त्यास उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फौजदार चावडी पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
होडी उलटून वृध्दाचा मृत्यू
पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोलीहून सरकोली गावाकडे निघालेली होडी भीमा नदीत बुडाली. या दुर्घटनेत पांडुरंग मारुती कदम (वय ७०, रा. आंबे चिंचोली) या वृध्दाचा मृत्यू झाला. मृत कदम हे अन्य १५ व्यक्तींच्या होडीत बसून आपल्या नात्यातील एका मृत महिलेच्या तिसऱ्या दिवसाच्या कर्यक्रमासाठी निघाले होते. होडी बुडू लागताच पोहता येणाऱ्या अन्य व्यक्तींनी स्वतचे प्राण वाचविले. होडी नादुरुस्त असताना आणि होडी वाहतुकीचा परवाना नसताना होडी चालवून या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याप्रकरणी होडीचालक संजय केरप्पा गालफाडे (रा. सरकोली) याच्याविरुध्द पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.