लासलगाव-कोळपेवाडी रस्त्यावर रविवारी रात्री मित्राच्या सहाय्याने दरोडा व बलात्काराचा बनाव रचत पत्नीची हत्या करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील कोळेवाडी येथील एकास पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने पत्नीचा काटा काढण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सिन्नर तालुक्यातील कोळगाव येथील हे दांपत्य रविवारी दुचाकीने मालेगाव तालुक्यातील रावळगावजवळील जळगाव येथे पत्नीच्या बहिणीकडे गेले होते. सायंकाळी ते परतीच्या मार्गावर असताना हा प्रकार घडल्याचे संशयित पतीकडून आधी सांगण्यात आले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास उपरोक्त रस्त्यावरील लासलगाव-कोळपेवाडी रस्त्यावरील सातमोरीजवळ आले असता चार दरोडेखोरांनी त्यांना अडविले आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. रस्त्याच्या बाजुला नेऊन पतीवर वार केले. अंगावरील कपडे काढून पतीचे हातपाय बांधले. पतीने आपल्या भ्रमणध्वनीवरून घरी संपर्क साधून दरोडेखोर आपल्याला व पत्नीला मारत असल्याचे कळविले. ही बाब लक्षात आल्यावर दरोडेखोरांनी भ्रमणध्वनी हिसकावून घेतला. त्यानंतर पतीला शस्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी पत्नीवर आळीपाळीने बलात्कार केला. या महिलेच्या अंगावरील सात ग्रॅम वजनाचे दागिने व सहाशे रुपयांची रोकड घेऊन पोबारा करताना दरोडेखोरांनी तिच्यावर वार केले. पतीचा कोळगाव येथे आधी दूरध्वनी गेला असल्यामुळे सर्व नातेवाईक जमा झाले आणि त्यांनी वावी पोलीस ठाण्यात रात्री साडे दहा वाजता याबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण पोलीस दल कार्यप्रवण झाले. लासलगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी लासलगाव -कोळपेवाडी रस्त्यावर संबंधितांचा शोध सुरू केला. दरम्यानच्या काळात सर्वत्र नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. कोळगाववरुन संबंधितांचे नातेवाईकही शोध घेण्यास निघाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, निफाडचे पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे घटनास्थळी दाखल झाले. रात्री बारा वाजता अखेर जखमी पती-पत्नी सापडले. परंतु, तोपर्यंत पत्नीचा मृत्यू झाला होता.
संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी चार खास पथके स्थापन केली. श्वान पथकाने एका रस्त्यापर्यंत माग काढला. ठसे तज्ज्ञ व न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांनीही घटनास्थळ पिंजून काढून पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात दरोडा, बलात्कार व खून या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, पोलिसांना या प्रकरणातील धागेदोरे शोधताना वेगळीच माहिती पुढे आली. तक्रारदार पती भारत धोकरट याचे यापूर्वी पत्नीशी वाद झाले होते. तो तिला सातत्याने मारहाण करत असे. या कारणास्तव ती आपल्या आई-वडिलांकडे गुजरातमध्ये निघून गेली. दीड वर्ष ती त्या ठिकाणी वास्तव्यास असताना धोकरट हा तिला नेण्यासाठी गेला नाही. त्यामुळे गुजरात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. तेथील महिला सुरक्षा कक्षाने धोकरटला बोलावून पत्नीला पुन्हा नांदण्यास नेण्यास सांगितले. त्यानंतर अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने संशयित पतीनेच हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या प्रकरणी धोकरट विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.