जिल्ह्य़ात नऊ वर्षांनंतर झालेल्या वन्यप्राण्यांच्या गणनेनंतर बहुतांश प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले असले, तरी रानमांजर, सायाळ, लांडगा यासारख्या प्राण्यांमध्ये मात्र कमालीची घट झाली आहे.
दरम्यान, उद्या (बुधवारी) जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे’ चा नारा देणाऱ्या वनविभागाने वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी आता नागरिकांना साकडे घातले आहे.
मराठवाडय़ात औरंगाबादनंतर सर्वाधिक वनपरिक्षेत्र नांदेड जिल्ह्य़ात आहे. जिल्ह्य़ातील माहूर, किनवट, भोकर भागात मोठय़ा प्रमाणात वनक्षेत्र असल्याने तेथे प्राण्यांचे वास्तव्यही बऱ्यापैकी आहे. जिल्ह्य़ात सद्यस्थितीत १२ टक्के वनक्षेत्र उरले आहे. तीन तालुके वगळता कुठे विरळ तर कुठे घनदाट जंगल आहे. या जंगलात बिबटे, अस्वल, तडस, रानडुक्कर, हरिण, चितळ, लांडगा, चिंकारा, रानकुत्री, लंगूर, कोल्हे, मसण्याउद, रानमांजर यांसारखे प्राणी वास्तव्यास आहेत. सन २००५ पूर्वी दरवर्षी वन्यप्राण्यांची गणना होत होती. पण २००५ पासून राज्य सरकारच्या आदेशानुसार त्यात खंड पडला.
वन्यप्राण्यांची गणना करण्याबाबत सरकारचे कुठलेही सुधारित आदेश नसताना नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक जी. पी. गरड यांच्या पुढाकाराने यंदा वन्य प्राण्यांची गणना पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात करण्यात आली. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी असल्याने जेथे पाणवठे आहेत तेथेच वन्यप्राणी आपली तहान भागवतात. याच ठिकाणी ही गणना केली जाते. पाणवठय़ाजवळ उंच मचाण बांधून तब्बल २४ तास वन्यप्राण्यांची गणना झाली.
जिल्ह्य़ात १२ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक पाणवठे, लहान-मोठे तलाव, नदी-बारमाही नाले यावरही प्रगणना होणार आहे. सहायक वनसंरक्षक एस. एम. पोतुलवार, सी. एस. जॉर्ज व सी. एम. सुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली ही गणना पूर्ण करण्यात आली. वन्यप्राण्यांची गणना योग्य पद्धतीने व अचूक होण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या, त्या यशस्वी झाल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक शंकरवार यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्य़ातील वनपरिक्षेत्र कमी होत चाललेले असताना प्राण्यांचे वास्तव्य मात्र वाढत चालले आहे. वन विभागाने उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केलेल्या उपाययोजना यशस्वी झाल्या आहेत. उपवनसंरक्षक जी. पी. गरड यांनी उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आपल्या अधीनस्थ सर्वच अधिकाऱ्यांना आवश्यक ती काळजी घ्या, असे निर्देश दिले होते. याचेही चांगले परिणाम दिसून आले.

बिबटय़ाची हुलकावणी!
बिबटय़ा, तसेच अन्य काही वन्यप्राणी या प्रगणनेत आढळलेच नाहीत. नीलगाय, मोर, चितळ, माकड, अस्वल, बिबट, ससा, रानडुक्कर, कोल्हा, मुंगूस, काळवीट, सांभर या वन्यप्राण्यांत लक्षणीय वाढ झाली. पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात केलेल्या प्रगणनेत नीलगाय (७२९), मोर (१२६५), चितळ (१२), माकड (१९७), अस्वल (५८), बिबट (६), ससा (१०३), रानडुक्कर (१४२७), कोल्हा (२२७), मुंगूस (३०), काळवीट (३०), सांभर (१५) असे प्राणी आढळून आले. नांदेडच्या जंगलात बिबटय़ा वाघाचा वावर असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. वनविभागाच्या नोंदणीत मात्र २००१नंतर असा कोणताही वाघ नसल्याचे स्पष्ट होते.