जिल्ह्य़ातील प्रादेशिक वनविभागातील राखीव जंगले व अभयारण्यातील जैवविविधता मोठय़ा प्रमाणावर नष्ट होत असल्याने दुष्काळ पाणीटंचाईचा भीषण सामना करण्यासोबत वन्यप्राण्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. विशेषत: बिबटय़ा, अस्वल, रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या जीवनसंघर्षांचा फटका नागरिक व पाळीव प्राण्यांच्या जीवावर बेतण्यावर होऊ लागला आहे. लाखो वृक्षांची अवैध वृक्षतोड व जलसंधारणाचा फोलपणादेखील याला कारणीभूत आहे.
वनखात्याने योजना व योजनाबाह्य़ कोटय़वधी रुपये खर्च केल्यानंतरही जिल्ह्य़ातील प्रादेशिक राखीव जंगले व अभयारण्यात वृक्ष संवर्धन, वन जलसंधारण, नैसर्गिक पाणस्थळी, नैसर्गिक पाणवठे निर्माण होऊ शकलेले नाहीत. पूर्वी चैत्रपालवीनंतर या दिवसात वन जलसंधारणामुळे वृक्षांना पालवी फुटायची व ते हिरवेगार होण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. जंगलांची निरीक्षणे नोंदविल्यानंतर आज जिल्ह्य़ातील प्रादेशिक राखीव वनांमध्ये व अभयारण्यांमध्ये एखादा अपवाद वगळता कुठेही चैत्रपालवी फुटलेली दिसत नाही. ऊन्हामुळे जंगलातील बहुतांश झाडे अक्षरश: वाळून गेल्यागत सांगाडा झाली आहे. शेजारच्या मोताळा राजूर घाटात व ज्ञानगंगा अभयारण्यात हे चित्र दिसून येते. वनखात्याने जिल्ह्य़ातील प्रादेशिक वनांवर व अभयारण्यांवर योजना व योजनाबाह्य़ कोटय़वधी रुपये खर्च केले. वनजलसंधारण, वृक्ष संवर्धन, पाणस्थळी निर्मिती व कायम झिरपणारे पाणवठे त्यातून साकार व्हावे, अशी अपेक्षा होती. मात्र, हा कोटय़वधी रुपयांचा निधी वनसंरक्षण व संवर्धनासाठी खर्च न होता तो कुठे जिरला, असा मुलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. झाडे व झाडांच्या करवंदी जाळ्यांचे नष्टचर्य, अन्न व पाण्याची मारामार यामुळे जंगलातील वन्यप्राणी सैरभर झाले आहेत. ते जंगल सोडून पाण्यासाठी रस्ता मिळेल तिकडे पळत आहे. विशेषत: बिबटे, अस्वल, रानडुक्कर यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.  जवळच असलेल्या जळगाव जिल्ह्य़ाच्या सीमेवर कापूसवाडी गावात नरभक्षक बिबटय़ाला अखेर गावकऱ्यांना मारून टाकावे लागले. धाड परिसरात बिबटय़ाच्या उच्छादाने वीस जनावरे मेली आहेत. वरवंड शिवारात माणूस व अस्वल यांच्या संघर्षांत दोघेही मृत्यूमुखी पडले. मंगळवारी खामगाव तालुक्यातील निमकवळा गावात तहानेने व्याकुळ झालेले तीन अस्वल मृत्यूमुखी पडले. ज्ञानगंगा अभयारण्याजवळच्या सगळ्या गावांना या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांची भीती निर्माण झाली आहे. प्रादेशिक व राखीव जंगलात अन्न पाण्यासाठी सैरभर पळणाऱ्या डुकरांच्या शिकारी वाढल्या आहेत. एकूणच परिस्थिती अतिशय गंभीर असून विस्कटलेल्या जैवविविधतेमुळे हे प्राणी प्रकोप वाढले आहेत. यावर निधीची मुबलकता असलेला प्रादेशिक वनविभाग कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यास तयार नाही. या विभागामार्फत योजना व योजनाबाह्य़ वनजलसंधारणावर दहा कोटी रुपये दरवर्षी खर्च होतो. मात्र, वनांची जैवसाखळी कायम राहण्यासाठी या रकमेचा कुठलाही उपयोग होत नाही. वृक्ष लागवडीची बोंबाबोंब करणाऱ्या वनखात्याच्या आशीर्वादानेच दरवर्षी लाखो खाजगी व सरकारी वृक्ष कापले जातात.  ही बाब देखील वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या मुळावर उठली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वनपाल व वनकर्मचारी संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्य़ातील जंगले व वन्यप्राण्यांच्या परिस्थितीची वस्तूनिष्ठ निकषावर राज्याचे प्रधान सचिव वने व मुख्य प्रधान संरक्षकांनी पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.