08 August 2020

News Flash

भुजबळ येवल्यात परत येतील काय?

पालकमंत्री व येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना जेव्हा राष्ट्रवादीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

| May 17, 2014 01:08 am

पालकमंत्री व येवला विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना जेव्हा राष्ट्रवादीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी येवलेकरांनी त्यांना लोकसभा निवडणूक लढवू नये अशी विनवणी केली होती. निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव झाल्यामुळे येवलेकरांच्या विनवणीचा नाशिककरांनी आदर करून ते येवल्यातच राहतील अशी व्यवस्था केल्याची प्रतिक्रिया येथे विरोधकांकडून व्यक्त होत आहे. पराभव झाल्यामुळे भुजबळ विधानसभेसाठी येवल्यातून उमेदवारी करणार काय, तसेच त्यांचे राजकीय भवितव्य काय याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
२००४ पूर्वी येवला-लासलगाव मतदारसंघात फारसे वर्चस्व नसताना छगन भुजबळ यांनी विजय मिळविला. भुजबळांनी विकास कामे करत झंझावात निर्माण केल्याने माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मतदारसंघात फिरणेही बंद केले होते. नाशिकमध्ये भुजबळांचा पराभव झाल्यामुळे आता भुजबळांचे काय हा प्रश्न येवल्यात विचारला जाऊ लागला आहे. भुजबळांची दिल्लीवारी हुकल्याने ते पुन्हा येवल्यातच थांबण्याची चिन्हे दिसू लागल्याने स्थानिक नेत्यांचेही धाबे दणाणू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कल्याणराव पाटील यांनी मात्र येवला-लासलगाव मतदारसंघातून उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे.
गोडसे हे भुजबळांचा पराभव करू शकतात. तर, मला काय अडचण आहे, असे कल्याणराव यांचे म्हणणे आहे. गोडसे लढले आता मीही लढणार, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी भुजबळांना एकप्रकारे आव्हानच दिले. तर, जनतेने ‘विकास पुरूष’ म्हणून भुजबळांना स्वीकारायला पाहिजे होते. परंतु मोदी लाटेमुळे त्यांच्यावर गदा आली, असे मत नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केले. भुजबळ पुन्हा येवल्यात येतील की नाही याचा निर्णय तेच घेतील, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी देशपातळीवरील मोदींच्या लाटेचा परिणाम म्हणजे भुजबळांचा पराभव असल्याचे म्हटले असून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीसंदर्भात ‘नो कॉमेंटस्’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दिंडोरीतील मोठय़ा मताधिक्याने महायुतीचा झालेला विजय हा राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करावयास लावणारा असून भुजबळांची दादागिरी नाशिककरांनी संपविली तशी त्यांची येवल्यातील दहशतगिरी संपवू, असे भाजप तालुका सरचिटणीस आनंद शिंदे यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2014 1:08 am

Web Title: will chhagan bhujbal return to yeola again
Next Stories
1 महायुतीची काँग्रेस आघाडीला ‘धोबीपछाड’
2 .. अन् वाढत गेला कार्यकर्त्यांचा उत्साह
3 उत्साहाला उधाण ; मनमाडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
Just Now!
X