दिग्रस विधानसभा मतदारसंघातील काही गावांमध्ये अलीकडेच झालेल्या संततधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी राज्य सरकार नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.
आपण यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणी करून नुकसानीची माहिती त्यांना देऊन व तातडीने पूरग्रस्तांना मदत व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करू, असे त्यांनी या पाहणीच्या वेळी सांगितले. फुबगाव, नखेगाव  डोल्हारी या तीन गावांचा दौरा करून प्रदेशाध्यक्षांनी तेथील नुकसानीची पाहणी केली. संततधार पावसामुळे या भागातील नदीनाल्याच्या काठाजवळील शेती मोठय़ा प्रमाणात खरडल्या गेली आहे. वीज कंपनीचे खांब कोलमडले असून रस्तेही मोठय़ा प्रमाणात उखडल्या गेले. हे प्रदेशाध्यक्ष ठाकरेंनी यावेळी स्वत: अनुभवले. या दौऱ्यादरम्यानच ठाकरेंनी प्रशासनाला तातडीने कामाला लावले. शक्य तितक्या लवकर नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ सिहे, माजी सभापती खोडे, दारव्ह्य़ाचे नगराध्यक्ष अशोक चिरडे, युवक काँग्रेसचे बिबेकर, प्रकाश नवरंगे, ज्ञानेश्वर बोरकर, सय्यद फारुक यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकत्रे मोठय़ा संख्यने उपस्थित होते.