गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांना खरेच पाणी मिळणार का? असा सवाल अॅड. रविकाका बोरावके यांनी शेतीसाठी सहा आवर्तने देणार या जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केलेल्या घोषणेवर बोलताना केला.
महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही मंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर जनता आता विश्वास ठेवायला तयार नाही. कुठलाही गंभीर प्रश्न जरी उपस्थित केला तरी केवळ तेवढय़ापुरती वेळ मारून नेण्यापलीकडे त्या घोषणेला कुठलाही आधार नसतो. वीज टंचाईच्या स्वरूपात २०१२ पर्यंत महाराष्ट्र भारनियमन मुक्त होईल ही घोषणा पूर्ण करता आली नाही. नगर-मनमाड महामार्गाचे काम दोन महिन्यात सुरू होईल. आता कॉन्ट्रॅक्टर बदलला, आता जमीन अधिग्रहन झाले. आता एक महिन्यात काम सुरू होईल ही घोषणा गेली १० वर्षांपासून जनता ऐकते आहे पण रस्ता काही होत नाही. शिर्डी प्राधिकरण करावयाचे त्यासाठी परिसरातील गावांमधील सर्व व्यवहार ठप्प करण्यात आले. त्या प्राधिकरणाचे काय झाले? शिर्डीतील बांधकामाचे चटई क्षेत्र वाढवून देऊ याचे काय झाले? गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासंदर्भात दरवर्षी घोषणा केली जाते पण त्यासाठी निधी दिला जात नाही. निळवंडे धरणाच्या चाऱ्या गेली कित्येक वर्षांपासून आखणी होऊनही पूर्ण होत नाही. युतीच्या काळात ८० ते ९० टक्के काम झालेले उजनी प्रकल्प तसेच जीवन प्राधिकरणाचे जनतेला पिण्याचे पाणी पुरविल्याचे कामही करता आलेले नाही. याप्रमाणे केलेल्या अनेक घोषणा सरकारला पूर्ण करता आलेल्या नाहीत. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांची चेष्टा या सरकारने करू नये. नजरेत भरावे असे कोणतेही काम या सरकारने केलेले नाही. तेव्हा गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांना सहा आवर्तने देण्याची घोषणा नामदार सुनील तटकरे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांपुढे केली. त्यावर किती विश्वास ठेवायचा. वैतरणेचे पाण्याचे गेट १ वर्षांत बसवून पाणी देऊ अशी घोषणा झाली. मुळात शासनाकडे हा प्रस्ताव आला आहे का? त्याला शासनाने मंजुरी दिली आहे का? निधीची तरतूद आहे का? कशाच्या आधारावर ही घोषणा केली आहे. असा सवाल भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रविकाका बोरावके यांनी केला आहे. केवळ ही घोषणा जरी पूर्ण करता आली तरी गोदा खोऱ्यातील शेतकऱ्यांचा दुवा या मंत्री महोदयांना व परिसरातील नेत्यांना निश्चित मिळेल. परंतु इतर अनुभवाप्रमाणे केवळ वेळ मारून नेण्यासाठी जर घोषणा केली असेल तर शेतकरी या पुढाऱ्यांना माफ करणार नाही याची जाणीव ठेवावी एवढाच इशारा या निमित्ताने देऊ इच्छितो अशा प्रकारचे पत्रक सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या व जनेतच्या वतीने  बोरावके यांनी प्रसिद्धीस दिले.