लाच प्रकरणी माजी प्राचार्याना अटक झाल्यानंतर खालसा महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात तीन दशके काम करत असलेल्या डॉ. किरण माणगावकर यांची प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना विद्यादान करणाऱ्या प्राध्यापकांना अधिक प्रशिक्षित करण्यावर विशेष भर देण्याचा तसेच महाविद्यालयाचा शैक्षणिक व सांस्कृतिक दर्जा उंचावण्याचा त्यांचा मानस आहे.
 डॉ. माणगावकर हे यापूर्वी पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. याआधी त्यांनी मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयातही प्राचार्य पदाची धुरा सांभाळली आहे. या दोन्ही ठिकाणी प्राचार्य म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात पीएच.डी. मिळवल्यानंतर त्यांनी २२ वष्रे रुईया महाविद्यालयात बीएस्सीच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम केले. यानंतर त्यांनी सात वष्रे मिठीबाई महाविद्यालयातही अध्यापनाचे काम केले. या सर्व कालावधीत त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळामध्ये तसेच आर.आर.सी. अशा विविध पदांवरही काम केले. त्यांनी आतापर्यंत ३३ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे.
खालसा महाविद्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पुढील दोन वर्षांच्या कामाचा आराखडा तयार केला असून यामध्ये प्राध्यापकांना अधिक प्रशिक्षित करण्यावर त्यांचा भर असणार आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राध्यापकांना पुस्तकी माहितीबरोबरच सध्याची बाजारातील गरजही माहिती असावी आणि तेथील संशोधनाची जाणही असावी या उद्देशाने शिक्षकांना थेट कंपन्यांमध्ये पाठवून अनुभव घेण्याची संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयात ज्या प्राध्यापकांनी अद्याप पीएच.डी. पूर्ण केलेली नाही त्यांना पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येईल,ा असेही डॉ. माणगावकर म्हणाले. प्राध्यापक जर अधिक शिकले तर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार या हेतूने हा प्रयोग करण्याचा मानस असल्याचे ते सांगतात.
विद्यार्थ्यांना नोकरीच्या दृष्टीने अधिक प्रगल्भ करण्यासाठीही महाविद्यालयात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांच्या जोडीलाच विविध कौशल्य अभ्यासक्रम शिकवण्यात येतील असेही ते म्हणाले. शालेय वयातच विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनाची आवड व्हवी या उद्देशाने ‘स्कूल कॉलेज कॉम्पलेक्स’ सुरू करण्यात येणार असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतील प्रयोगशाळांमध्ये घेऊन जाऊन विविध प्रयोग याचबरोबर उपकरणांची ओळख करून दिली जाणार असल्याचेही ते म्हणाले.