राज्यातील २३ हजार ५०० वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ केली जाणार असून त्यासाठी २३ कोटी ५७ लाख रुपयांची तरतूद असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. संगीतकार व जनकवी पी. सावळाराम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शासनातर्फे कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे व त्यासंबंधी शासनाने नोव्हेंबर महिन्यात ती मान्यही केली होती. मात्र अद्यापही वाढ न झाल्याने शासनाप्रति कलावंतांमध्ये निराशा निर्माण झाली आहे, याकडे हेमंत टकले, प्रकाश बिनसाळे, राजेंद्र जैन, किरण पावसकर, दीपक साळुंखे, विद्या चव्हाण, रमेश शेंडगे, जयवंत जाधव, नरेंद्र पाटील यांनी एका लक्षवेधी सूचनेद्वारे लक्ष वेधले.
राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांची अ श्रेणी, राज्यस्चरावरील कलावंतांची ब श्रेणी व  स्थानिक स्तरावरील कलावंतांची क श्रेणी असते. या श्रेणीत एकूण २३ हजार ५०० वृद्ध कलावंत आहेत. त्यांना अनुक्रमे एक हजार, १ हजार २०० व १ हजार ४०० रुपये मानधन दिले जाते. मानधनात दीडपट वाढ करण्याची घोषणा नागपूरला ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात केली होती. त्यानुसार आता अनुक्रमे २ हजार १००, १ हजार ८०० व १ हजार ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी २३ कोटी ५७ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्हास्थानी चार कलावंतांचा समावेश असलेली समिती असते. पंचायत समिती स्तरावरून आलेल्या अर्जाची तपासणी व खात्री करून वृद्ध कलावंतांची नोंदणी ही समिती करते. संगीतकार व जनकवी पी. सावळाराम यांच्या जनमशताब्दीनिमित्त शासनातर्फे कार्यक्रम आयोजित केले जातील, असे संजय देवतळे यांनी संगितले.