राज्य सरकारने कल्याण डोंबिवली शहरांच्या विकासासाठी कोटय़वधी रूपयांचा निधी महापालिकेला दिला. या शहरांचे बकालपण पाहता हा निधी कसा खर्च केला याची आता चौकशी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपला कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला.
शहर विकासांसाठी निधीची कमतरता शासनाने पडू दिली नाही. जेथे जेथे सेना-भाजपची सत्ता आहे. तेथे निधीचे वाट्टोळे करण्यात आले, अशी खरमरीत टीका त्यांनी केली. कल्याणच्या आमदाराने किती प्रश्न विधीमंडळात उपस्थित केले आणि किती सोडवले हा खरा प्रश्न आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप व स्थानिक मनसे आमदारावर निशाणा साधला.
ठाणे जिल्ह्यातील बहुतेक पालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या पालिकांना राज्य सरकारने कोटय़वधी रूपयांचा निधी विकास कामांसाठी दिला. तरीही या पालिकांमधील समस्यांचे डोंगर वाढत असल्याची खंत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त करून शिवसेना, मनसे सत्ताधाऱ्यांना टीकेचे लक्ष्य केले.
राज्यात झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. नागरी प्रशासन हे मोठे आव्हान सरकारसमोर यापुढे असणार आहे. नव्याने वाढत असलेल्या व ग्रामीण महाराष्ट्राच्या समस्या जाणून घेणारे सरकार सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे. गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेसने विकास कामांच्या माध्यमातून राज्याची बांधणी करण्याचा प्रयत्न केला असे सांगून भाजप सेनेबरोबर आगामी सत्तेची गणिते करून राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडली, अशी टीका चव्हाण यांनी केली. मुंबई केंद्र शासीत करणे, राज्याचे तुकडे करणे, राज्यातील उद्योग व्यवसाय, प्रशिक्षण अकादमी गुजरातला पळवणे असे प्रकार मोदी सरकारने सुरू केले आहेत. नरेंद्र मोदी भारताचे कमी आणि गुजरातचे पंतप्रधान वाटतात अशी बोचरी टीका करीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असे आवाहन चव्हाण यांनी केले. देशाला एकसंध ठेवण्याची ताकद भाजपमध्ये नाही. राज्यात युतीची सत्ता असताना गुंडाराज होते. त्यानंतर आलेल्या काँग्रेस राजवटीने विकासावर भर देऊन राज्याच्या चेहरा बदलला असे ते म्हणाले.
कल्याण मधील काँग्रेस उमेदवार सचिन पोटे यांना विजयी करून जनतेने विकासाला विजयी करावे. राज्यात सत्ता आल्यानंतर कल्याण डोंबिवली शहरांचा चेहरा बदलून टाकू असे आवाहन पृथ्वीराज बाबांनी केले. दरम्यान, कल्याण डोंबिवली पालिकेला मागील सात ते आठ वर्षांत शासनाकडून आलेल्या कोटय़वधी रूपयांच्या निधीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या आहेत. काही प्रकरणांत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. काहींचे अहवाल शासनाकडे दाखल करण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेतील निधीकडे डोळे वटारल्याने खळबळ उडाली आहे.