* पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम
* महिला मेळावा निर्णायक ठरणार
महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संदीप फुंडकर यांना नारळ दिल्याने हे पद अद्याप रिक्त आहे. गेल्या वर्षभरात अनेक नेते अकोल्यात आले. त्यांनी राष्ट्रवादीचा येथे झालेला पक्षविस्तार व अंतर्गत बंडाळी अनुभवली. या सर्व घटना व घडामोडीनंतर अकोला शहर अध्यक्षपदाचा वाद अद्याप कायम आहे. निदान नव्या वर्षांत तरी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते हा प्रश्न सोडवतील का, अशी विचारणा सामान्य कार्यकर्ता करत आहे. शहर अध्यक्षपदाचा तिढा २२ जानेवारीला होणाऱ्या महिला मेळाव्यात सुटेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अकोला जिल्ह्य़ात राष्ट्रवादीकडे मूर्तीजापूर हा विधानसभा मतदार संघ ताब्यात होता, पण गेल्या विधानसभेत तो भाजपच्या ताब्यात गेला. त्यामुळे जिल्ह्य़ात एकही आमदार राष्ट्रवादीचा नाही. मागील सत्ताकाळात राष्ट्रवादीने काँग्रेससोबत एकत्र निवडणूक लढवून महापालिकेत सत्ता काबीज केली होती, पण गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मतदान वाढले, पण उमेदवार कमी झाले. याचा फटका पक्षाला बसला. यंदा महापालिकेत महाआघाडीच्या सत्तेत पक्ष आहे, पण पक्षाचा आवाज दबला.
 अकोल्यात पक्ष विविध गटातटात विखुरला आहे. त्यामुळे पक्षनेत्यांना येथे शहर अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार मिळत नसल्याचे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व्यक्त करतात. येथील अध्यक्षपदाचे अनेक अहवाल प्रदेशपातळीवर धुळखात पडले आहेत. विविध कार्यकर्त्यांच्या मागण्यांचे निरनिराळे पत्र व गटातटाच्या राजकारणाचा अनुभव पक्षाच्या वरिष्ठांना सतत येतो. त्यामुळे वरिष्ठांच्या मनात सकारात्मक चित्र नसून अकोल्याबद्दल ते नाके मुरडतात. डॉ.संतोष कोरपे यांचा जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. नव्याने त्यांना नियुक्तीची घोषणा पक्षाने जाहीर न केल्याने त्यांच्याकडे दोन्ही पदाचा प्रभार आहे. त्यामुळे पक्षाला जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष जाहीर करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.
भविष्यातील निवडणुकांचे गणित पाहता राष्ट्रवादीचा अकोल्यात विस्तार आवश्यक आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक असो की, जिल्हा परिषद पक्षाला येथे शहर व जिल्हा अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवाराची निवड यंदा करावीच लागेल. अन्यथा, येथे राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्यासाठी इतर पक्ष सरसावतील. जिल्हा व शहर अध्यक्ष हे पद अत्यंत महत्वाचे असताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अकोल्याकडे कुठल्या फॅक्टरमुळे दुर्लक्ष करतात, असा प्रश्न उपस्थित होतो. जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज पक्षाला आहे.
जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्षपदासाठी मराठा, ओबीसी, अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीकडे नेतृत्व देताना ते एकाच समाजाकडे झुकते नसावे, अशी अपेक्षा कार्यकर्ते खाजगीत व्यक्त करतात. नववर्षांच्या सुरुवातीला पक्षाला योग्य व सक्षम नेतृत्व मिळेल, अशीच अपेक्षा ज्येष्ठांकडूनही व्यक्त होत आहे.
महिला मेळाव्यात धक्कातंत्र
युवती मेळाव्यानंतर आता राष्ट्रवादीचा महिला मेळावा येत्या २२ जानेवारी रोजी होणार आहे. यात खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संपर्कमंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचा दौरा होण्याची चिन्हे आहेत. अद्याप मेळाव्याचे ठिकाण व पाहुण्यांच्या नावाची निश्चित झाली नाही. या मेळाव्यात पक्षाच्या वरिष्ठांनी येथे जिल्हा व शहर अध्यक्षांची घोषणा करण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. पक्ष धक्कातंत्राचा वापर करत या मेळाव्यात या दोन्ही पदांची घोषणा करु शकते, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.