* ठाणे महापालिकेत चर्चेला उधाण
* अतिक्रमणविरोधी मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह
* राजीव यांच्यानंतर कोण? तर्कवितर्क सुरू  
आपल्या रोखठोक कार्यपद्धतीमुळे गेल्या तीन वर्षांपासून ठाणे शहरात स्वत:चा एक वेगळा दरारा निर्माण करणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव येत्या सोमवारपासून (२९ एप्रिल) एक महिन्यांच्या व्यक्तिगत रजेवर निघाले असून याच दरम्यान त्यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळही संपत असल्याने रजेवर निघालेले राजीव महापालिकेत पुन्हा परतणार का, अशी चर्चा येथील राजकीय, सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे. शीळ येथील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरांतील बेकायदा बांधकामांविरोधात महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली असून याच काळात राजीव रजेवर निघाल्याने या मोहिमेलाही खोडा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महापालिकेतील राजीव यांचा तीन वर्षांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ येत्या २५ मे रोजी संपत आहे. सुटीच्या काळातच राजीव यांना तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे महापालिका वर्तुळात राजीव यांच्यानंतर कोण, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
राजकीय सुंदोपसुंदीमुळे सतत चर्चेत राहिलेल्या ठाणे महापालिकेत गेल्या तीन वर्षांत खऱ्या अर्थाने राजीव यांचीच एकहाती सत्ता चालली, असे चित्र स्पष्टपणे दिसले. टी. चंद्रशेखर यांच्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेले आयुक्त म्हणून राजीव यांचे नाव घेतले जाते. राजकीय क्षेत्रातील बडे नेते, शहरातील सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या बडय़ा आसामी, पत्रकार, बिल्डर अशा सर्वच घटकांसोबत राजीव यांचे सतत खटके उडाले. त्यामुळे राजीव आणि वाद असे एक समीकरणच बनत गेले. तरीही विकासाचा वेगळा दृष्टिकोन बाळगून रखडलेली कामे धडाक्यात हातावेगळी करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे गेल्या तीन वर्षांत राजीव यांनी महापालिकेत वेगळा ठसा उमटविला. राजकीय नेत्यांच्या दबावाला अक्षरश धाब्यावर बसवत कठोर निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती वाखाणली गेली. विशेषत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या बेकायदा बांधकामाला नोटीस बजावून तसेच त्यांच्या गृहसंकुलातील पाणीचोरीचे ‘प्रताप’ उघड करून राजीव यांनी एकप्रकारे शिवसेनेला अंगावर घेतले. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राजीव यांनी कळवा-मुंब्रा परिसरांवर विकासकामांचा अक्षरश पाउस पाडला. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राजीव यांचा ‘दोस्ताना’ जमल्याची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यामुळे एरवी राजीव यांना वचकून असलेले शिवसेना नेते त्यांच्याविरोधात ‘आवाज’ चढविताना दिसले. आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत बेकायदा बांधकामे, फेरीवाले यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे राजीव शीळ येथील धोकादायक इमारतीत ७४ जणांचा बळी गेल्यामुळे काहीसे वादात सापडले. राजीव यांच्यासोबत काम करणारे काही बडे अधिकारी लाचप्रतापांमुळे अटकेत गेल्यामुळे आयुक्तांच्या कार्यपद्धतीलाच एकप्रकारे धक्का मानला गेला. शीळ येथील दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर राजीव यांनी मुंब्रा, कळवा, शीळ, दिवा, ठाणे भागांतील बेकायदा बांधकामांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. या पाश्र्वभूमीवर येत्या २९ एप्रिलपासून एक महिन्यांच्या व्यक्तिगत रजेवर निघाल्याने ते महापालिकेत परततील का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राजीव यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीला २५ मे रोजी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. तीन वर्षांनंतर त्यांना ठाणे महापालिकेत कायम ठेवायचे का, याचा निर्णय पूर्णत मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे. राजीव स्वत  मुदतवाढ घेण्यास इच्छुक नाहीत, अशी चर्चा सुरू आहे.
शीळ येथील दुर्घटनेपूर्वीच राजीव यांनी व्यक्तिगत कारणास्तव महिनाभराची रजा टाकली होती. २९ एप्रिलपासून एक महिना रजेचे वेळापत्रक जवळपास तीन महिन्यांपूर्वीपासूनच ठरले होते. राजीव यांच्या अनुपस्थितीत आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार कोकण विभागीय आयुक्त विजय नहाटा यांच्याकडे सोपविला जाईल, अशी चर्चा आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेलारसु यांचे नावही यासाठी चर्चेत आहे.