मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून स्थानिकांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी देण्यास मुंबई महापालिकेने आडमुठे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे कुणबी सेना अधिकच आक्रमक झाली असून त्यांनी जिल्ह्य़ातील सर्वच धरणांची कामे बंद पाडण्याची आणि मुंबईचा पाणीपुरवठा बंद करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधून मुंबई शहराला पाणीपुरवठा होत असून या धरणांमधून स्थानिकांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी मिळावे, अशी मागणी होती. मात्र, मुंबई महापालिकेने ना हरकत दाखला दिला नसल्यामुळे ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे गेली अनेक वर्षे पाण्याच्या मुद्दय़ावरून मुंबई महापालिकेविरोधात आंदोलन करणारी कुणबी सेना अधिकच आक्रमक झाली आहे. याच पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच धरणांची कामे बंद पाडण्याची आणि मुंबईचा पाणीपुरवठा बंद करण्याचा धमकीवजा इशारा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे. धरणांच्या निर्मितीसाठी गावेच्या गावे तसेच शेती व्यवसाय उद्ध्वस्त होणार असून तेथील नागरिकांना योग्य नुकसानभरपाई, जमिनीच्या बदल्यात जमीन आणि ज्या महापालिकांना त्या धरणाचे पाणी पुरविले जाणार आहे, त्या महापालिकेत रोजगाराची तरतूद केल्याशिवाय जिल्ह्य़ात आता नवीन धरणे बांधून देणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले आहे.