आयएनएस विक्रांत युद्धनौका ऐतिहासिक आणि प्रेरणा देणारी असल्यामुळे त्याचा लिलाव होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे. त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंगळवारी रात्री नितीन गडकरी यांचे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच शहरात आल्यावर भव्य स्वागत झाल्यानंतर आज सकाळी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी आणि स्मृती मंदिर परिसरात भेट दिली. यावेळी गडकरी म्हणाले, विक्रांत युद्धनौकेसंदर्भातील लिलावाच्या संदर्भात बरीच चर्चा झाली असून त्याला विरोध करण्यात आला. विक्रांत हे ऐतिहासिक आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे त्याचा लिलाव होऊ नये, अशी माझी भूमिका आहे. त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे. नागपूर शहराचा विकासासंदर्भात यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे. जी आश्वासने दिली आहेत ती येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जनहिताचे निर्णय घेतले जातील. विदर्भात सिकलसेल रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे विदर्भात संशोधन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या संदर्भात सर्व कागदपत्रे तयार केली असून आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवाय, नागपूरचे मेडिकल आणि मेयो या रुग्णालयाचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल. जनतेला केवळ आश्वासने न देता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी कटीबद्ध आहे.  
नितीन गडकरी यांनी सकाळी स्मृती भवन परिसरात जाऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. रेशीमबागेत सध्या तृतीय संघ शिक्षावर्ग सुरू असून त्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर दीक्षाभूमीला जाऊन भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, नाना शामकुळे, सुधाकरराव देशमुख, महापौर अनिल सोले, प्रवीण दटके, बंडू राऊत आदी उपस्थित होते. मंगळवारी रात्री वाडय़ावर झालेल्या गर्दीमुळे अनेक लोकांना आणि मान्यवरांना गडकरी यांना भेटता आले नाही. त्यामुळे आज सकाळी त्यांनी गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी
आले होते. सकाळपासून वाडय़ावर
गर्दी होती. सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून गडकरी दुपारी दिल्लीला रवाना झाले.