यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ व्यावसायिक पदवी, प्रशिक्षण असून उपयोगाचे नाही, तर ज्वलंत इच्छाशक्तीची जोड मिळणे गरजेचे असल्याचे मत आर. जे उद्योगसमूहाचे संस्थापक राघवेंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे ‘भारतातील उद्योजकता विकास व संधी’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे अध्यक्षस्थानी होते. प्रा. पी. पुरुषोत्तम राव, प्रा. बी. रमेश, प्रा. रमेश आगडी, प्रा. एस. बी. कोलते, डॉ. शिवाजी मदन, डॉ. कल्याण लघाने, डॉ. वाल्मीकी सरवदे आदी उपस्थित होते. जोशी म्हणाले, की जागतिकीकरणामुळे उद्योगक्षेत्रात मोठय़ा संधी निर्माण झाल्या आहेत. रोजगार व नवनिर्मितीची प्रेरणा देणारे शिक्षण आज आवश्यक आहे. त्यामुळे अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक ज्ञान आत्मसात केले पाहिजे.
डॉ. पांढरीपांडे यांनी सांगितले, की उद्योगाप्रमाणेच उच्च शिक्षण क्षेत्रातही संकल्पना बदलत आहेत. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन विकसित होत आहे. चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा व्यावसायिक वा लवचिक अभ्यासक्रम गरजेचे बनले आहेत. याची नोंद घेऊन विद्यापीठाने व्होकेशनल स्टडीजसारखा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
परिषदेत देशभरातून ३०० संशोधक, उद्योजक, प्राध्यापक सहभागी झाल्याचे वाल्मीकी सरवदे यांनी सांनी सांगितले. परिषदेत ११० शोधनिबंध सादर करून काही निवडक शोधनिबंधांची पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली.