नाशिकच्या बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर याच्या मालमत्तेचे आणखी घबाड नांदेडात मिळाले आहे. या बाबत अधिकृत कोणी माहिती देत नसले, तरी नांदेड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चिखलीकरची कोटय़वधीची जमीन असल्याचे उघड झाले आहे.
नांदेड शहरालगत किंवा शहराच्या आसपास १० किलोमीटर अंतरावर एकदरा, निळा, असदुल्लाबाद, जंगमवाडी, मरळक, विष्णुपुरी, फत्तेजंगपूर, असदवन अशा अनेक ठिकाणी चिखलीकरच्या १९ ते २० जमिनी असल्याचे सांगण्यात आले. आणखी काही मालमत्तांची चौकशी सुरू आहे. दस्तनोंदणी नियमानुसार या जमिनीची किंमत कमी असली तरी बाजारभावात या जमिनी कोटय़वधी रुपयांच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. तब्बल २० दस्त लाचलुचपत विभागाने आतापर्यंत जप्त केले आहेत. आणखी काही दस्तनोंदणी संदर्भात चौकशी सुरू आहे.
या बहुतांश जमिनी चिखलीकर दाम्पत्य व त्याच्या नातेवाइकांच्या नावावर आहेत. या जमिनींचे बाजारमूल्य शोधण्याचे काम सध्या सुरू असल्याचे समजते. चिखलीकरच्या या स्थावर मालमत्तेबाबत लाचलुचपत विभाग किंवा दस्तनोंदणी कार्यालयातील कोणीही बोलण्यास तयार नाही. पण चिखलीकर दाम्पत्याची ही मालमत्ता असल्याच्या वृत्ताला एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
ज्ञात स्रोतापेक्षा मोठय़ा प्रमाणात मालमत्ता प्राप्त केल्याच्या आरोपावरून चिखलीकरविरुद्ध लाचलुचपत विभागाने नव्याने गुन्हा दाखल केला आहे. चिखलीकर दाम्पत्याकडे आतापर्यंत १४ कोटी ६६ लाख १७ हजार ९१६ रुपयांची मालमत्ता मिळाली. मूळचा नांदेड जिल्ह्य़ातील चिखली गावचा रहिवासी असलेल्या सतीश चिखलीकर याने नांदेड जिल्ह्य़ात कुठेही नोकरी केली नसली तरी बँक ऑफ महाराष्ट्रच्या नांदेड शाखेत ३५ लाखांची रोकड मिळाली. अन्य एका बँकेच्या लॉकरमध्ये काही सापडले नसले तरी नांदेडच्या लाचलुचपत विभागाने त्याच्या स्थावर मालमत्तेचा शोध सुरू केल्याने चिखलीकरच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.